केंद्रीय पोलीस दलांमध्येही करोनाचा वाढता फैलाव

नवी दिल्ली – केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्येही (सीएपीएफ) मागील चार दिवसांपासून करोनाचा वाढता फैलाव आढळून येत आहे. त्यामुळे त्या दलांमधील सक्रिय बाधितांची संख्या 3 हजारांच्या घरात पोहचली आहे.
सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ आणि एसएसबी या केंद्रीय पोलीस दलांमध्ये 5 जानेवारी या दिवशी 964 सक्रिय बाधित होते. त्या संख्येत 9 जानेवारीच्या अखेरीस आणखी सुमारे 2 हजारांची भर पडली. रविवारी पाच केंद्रीय दलांमधील आणखी 618 जणांना करोना संसर्ग झाला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) सर्वांधिक 1 हजारहून अधिक सक्रिय बाधित आहेत. ते दल देशातील विमानतळांच्या आणि महत्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) सक्रिया बाधितांची संख्या 677 आहे.
सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) 515, तर सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) 379 सक्रिय बाधितांची नोंद झाली आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलात (आयटीबीपी) 148 सक्रिय बाधित आहेत. त्याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलात (एनडीआरएफ) आणि नॅशनल सिक्युरिट गार्डमध्ये (एनएसजी) अनुक्रमे 90 आणि 27 सक्रिय बाधित आहेत.

