प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – ग्रामीण भागातील तरुणांसह अनेक नागरिक झटपट पैसा मिळवण्याच्या हेतूने मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन रमी खेळण्याच्या व्यसनात अडकले आहेत. या ऑनलाइन जुगारामुळे वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य हरवून तरुण बरबाद होऊ लागले असून, त्यांच्यासोबत पूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. ऑनलाइन रमी खेळणारे लोक स्वतःच्या नावावर असलेला बँक बॅलन्स संपवून, गेलेला पैसा परत मिळवण्याच्या आमिषाने कुटुंबातील कोणालाही थांगपत्ता लागू न देता घर, जमीन, वाहन यावर लाखो रुपयांचे कर्ज काढत आहेत. वाडवडिलांची संपूर्ण आयुष्याची कमाई या ऑनलाइन रमीवर उधळून कुटुंबाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला जात आहे. स्वतःबरोबर संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडवून कुटुंबच बरबाद करणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी युवकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्याने शासनाने या ऑनलाइन रमी गेमवर तातडीने बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे. “सध्या पालक त्यांच्या मुलांना महागडे मोबाइल आणि हजारो रुपये देतात. मात्र, त्यानंतर पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाइल व पैशाचा कशाप्रकारे वापर होतो यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुले मोबाइलमध्ये कोणते ॲप वापरतात? त्यामध्ये काय करतात? याकडे लक्ष देत मुलांशी मैत्रत्वाने बोलून सोशल मीडियाचे धोके समजावून सांगणे गरजेचे आहे.” – दीपरतन गायकवाड, शिक्रापूर पोलीस निरीक्षक “मोबाइलमधील सोशल मीडिया वापरताना त्यामध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या जाहिरात येतात, मुलांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. तसेच कोणतेही ॲप्स ओपन करून त्याचा वापर न करणे गरजेचे आहे.” – दत्ता कवाद, सामाजिक कार्यकर्ते “शिरूर तालुक्यात मोबाइलमुळे घडणाऱ्या वाढत्या घटना लक्षात घेता, यापूर्वी आपण पंतप्रधान यांना मोबाइलचे काही ॲप्स बंद करण्यासाठी एक लाख सह्यांचे निवेदन पाठवलेले होते. पुढील काळात देखील अशी मोहीम आपण राबवणार आहोत.” – सिमा पवार, अध्यक्ष, सिमाई महिला आधार फाउंडेशन