अमरावती : लग्न हा आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण मानला जातो, पण अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावात आज हा आनंद काही क्षणांतच विरून गेला. लग्नविधी पूर्ण होऊन अवघ्या अर्ध्या तासात नवविवाहित अमोल गोड (वय ३२) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते नवरीसमोरच कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत असलेले अमोल गोड यांचा आज दुपारी शुभ मुहूर्तावर लग्नसोहळा पार पडला. मांडवात “शुभ मंगल सावधान”चे मंत्र घुमत होते, सर्वांनी जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या. फेरा पूर्ण होऊन फोटो काढण्याचे सत्र सुरू असतानाच अमोल यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते खुर्चीतून खाली कोसळले. उपस्थितांनी धावपळ करीत त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की, काही मिनिटांतच सर्व काही संपले. काही क्षणांपूर्वी हसत-खिदळत असलेला नवरा अचानक निर्जीव झाल्याचे पाहून नवरीसह दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नमांडवातून रडण्याचा आवाज घुमू लागला. पाहुण्यांनीही डोळ्यांत अश्रू लपवले. या दुर्दैवी घटनेमुळे पुसला आणि परिसरात शोककळा पसरली आहे. अमोल यांच्या निधनाने नवरीचे आयुष्य लग्नाच्या पहिल्याच दिवशी उद्ध्वस्त झाले, तर दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. अमोल यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी पुसला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.