पुणे जिल्हा | जुन्नरच्या विकासात तांबे कुंटुबीयांचे मोठे योगदान

ओतूर (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याची शेतीतील प्रगती व शैक्षणिक प्रगतीत स्व. आमदार श्रीकृष्ण तांबे (झांबरशेठ) व शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे यांचा मोठा वाटा आहे. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी तांबे कुंटुबीयांचे मोठे योगदान आहे.
झांबरशेठ व लताताई तांबे यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली व त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले.
जुन्नर तालुक्यातील लोकांचे जीवन कसे समृद्ध होईल, याच्या शिवाय दुसरा विचार झांबरशेठ यांनी केला नाही. तर शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे यांनी शून्यातून शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे करून शिक्षणाच्या संधी उभ्या करून दिल्या, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.
ओतूर (ता. जुन्नर) येथे जुन्नर तालुक्याचे आमदार स्व. श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ, जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार स्व. लतानानी तांबे व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे,
आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ओतूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे, ओतूरच्या सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, बाळासाहेब दांगट,
शरद सोनवणे, कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे, देवदत्त निकम, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे, बाजीराव ढोले, विशाल तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, देवराम लांडे,
शरद लेंडे, तुषार थोरात, माऊली खंडागळे, अनंतराव चौगुले, अनिल मेहेर, निलम तांबे, इंदिरा अस्वार, सुरेख वेठेकर, धनंजय डुंबरे, अशोक घोलप, माधवराव डुंबरे तसेच ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व ओतूर ग्रामस्थ उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, सध्या शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या वाढत आहे, मात्र जमीन आहे तेव्हढीच आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाने शेती एक शेती करून यापुढे चालणार नाही तर कुटुंबातील एकाने शेती करून इतरांनी शेती व्यतिरिक्त इतर नोकरी धंदा करावा.
याप्रसंगी स्व. झांबरशेठ व स्व. विलासराव तांबे यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी, सूत्रसंचलन भाऊसाहेब खाडे यांनी तर मोहित ढमाले यांनी आभार मानले.
खासदारांकडून आमदारांना चिमटा
50 वर्षांपूर्वी स्व. आमदार झांबरशेठ यांची केलेल्या कार्य कर्तृत्वाला आज आम्ही नतमस्तक होतो. ती नितीमत्ता ती तत्वनिष्ठा आजच्या काळात राहिली का ? असा प्रश्न आजच्या राजकारणातचा विचार केला की उभा राहतो.
माळशेज घाटाचे प्रणेते झांबरशेठ यांनी जर विकासाच्या नावावर भूमिका बदलली असती तर जनतेच्या मनात त्याचा पुतळा उभारताना शंका निर्माण झाली असती, असा चिमटा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीअतुल बेनके यांचे नाव न घेता कोल्हे यांनी काढला.
सत्ता, साधन, संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते ही अशी शिकवण शरद पवार आणि माझे वडील माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांनी दिली आहे. मताच्या राजकारणा पेक्षा विकासाच्या राजकारणतून पुढे जायचे असते ही शिकवण दिली आहे. येथून पुढे ही डॉ. अमोल कोल्हे यांच्या बरोबर आम्ही सर्व जण मिळून विकासासाठी पुढे जाण्यास कटिबद्ध आहेत.- अतुल बेनके, आमदार





