पुणे – क्रेडाई पुणे यांच्या वार्षिक मालमत्ता प्रदर्शनाच्या 24व्या आवृत्तीचा – ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026’ शुभारंभ हनीवेल ऑटोमेशन इंडियाचे अध्यक्ष गणेश नटराजन यांच्या हस्ते झाला. हे प्रदर्शन पुण्यातील अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले असून ते 18 जानेवारी 2026 पर्यंत सर्वांसाठी सुरू राहणार आहे. पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2026 हे गृहखरेदीदार व गुंतवणूकदारांसाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ असून, येथे परवडणार्या घरांपासून आलिशान निवासी प्रकल्पांपर्यंत, को-लिव्हिंग व सीनियर लिव्हिंग पर्याय, एनए प्लॉट्स, प्रीमियम व्हिला तसेच ग्रेड ‘ए’ व्यावसायिक प्रकल्प उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात 80 हून अधिक विश्वासार्ह विकासक सहभागी झाले असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील 400 पेक्षा अधिक महारेरा-नोंदणीकृत प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभास क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष अरविंद जैन, जे.पी. श्रॉफ आणि नितीन न्याती, तसेच रविंद्र डी. हिटनल्ली आणि संयोजक पुनीत ओसवाल उपस्थित होते. पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून विकासक, वित्तीय संस्था, चॅनल पार्टनर्स आणि संभाव्य गृहखरेदीदार एका विश्वासार्ह आणि प्रभावी व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तसेच या उद्घाटनाच्या एक दिवस आधी क्रेडाई पुणे यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठे विकासक-चॅनल पार्टनर नेटवर्किंग व्यासपीठ – यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या परिषदेला 1,000 हून अधिक चॅनल पार्टनर्सची विक्रमी उपस्थिती लाभली. क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन म्हणाले, हे प्रदर्शन सर्वांसाठीच विन-विन ठरते. चॅनल पार्टनर्सना दर्जेदार इन्व्हेंटरी उपलब्ध होते, खरेदीदारांना वेगवेगळ्या प्रकल्प स्थळांना भेट न देता अनेक पर्यायांची तुलना करता येते. तर विकासकांना गंभीर व लक्ष केंद्रीत ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाचतात.