महायुती सरकारकडून बेरोजगारांची क्रूर थट्टा केली जातेय; आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांचा आरोप

नेवासा (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, योजनादूत सारख्या फसव्या योजनांचा राज्यात सुळसुळाट झाला असल्याची खरमरीत टीका आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी केली आहे. राज्यातील बेरोजगारांची महायुती सरकारकडून क्रूर थट्टा केली जात असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशासनाने मनमानी, अनगोंदी करून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती केल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने गुरुवार पासून नेवासा पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांसमोर बोलताना आघाव म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे.
या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आदी अधिनस्त आस्थापनांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी नेमण्याची प्रक्रिया अत्यंत संदिग्धपणे राबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या अंतर्गत ग्रामपंचायत तसेच शहरी स्तरावर पन्नास हजार योजनादूत प्रशिक्षणार्थी भरती करण्यात आली आहे. यासाठी 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यास प्रेरित करण्याचे यासंदर्भातील परिपत्रकात नमूद करण्यात आले होते.
12वी पास प्रशिक्षणार्थ्यांना 6000 रुपये, पदवी, पदविका धारक प्रशिक्षणार्थ्यांना 8000 रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना 10000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार येणार आघाव यांनी लक्ष वेधले. मात्र या योजनेची कुठलीही जाहिरात न करता प्रशासकीय पातळीवरच हे परिपत्रक फिरून सर्व संबंधितांच्या मर्जीतील प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्त्या देण्यात आल्याची बाब आघाव यांनी निदर्शनास आणून दिली.
यासाठी अर्ज करण्यासाठी सुचविण्यात आलेले शासकीय संकेतस्थळ चालूच नसल्याची तक्रार इच्छुक उमेदवारांनी केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड असून महायुती सरकारचा त्यांच्याप्रति खरोखरच जर प्रामाणिक हेतू असता तर त्यांनी ही भरती पारदर्शक प्रक्रिया राबवून केली असती. मात्र या गोंडस योजनेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा संशय आघाव यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून शासन, प्रशासनाने मनमानी करून बेरोजगारांची क्रूर थट्टा चालविली असल्याची खंत आघाव यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आतबट्ट्याच्या कार्यपद्धतीने राबविण्यात आलेली असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित रद्द करून ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी आघाव यांनी यावेळी केली. यासंदर्भात लवकरच जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
नेवासा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय लखवाल तसेच गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी दिवसभरात आंदोलकांची समजूत काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला. यासंदर्भातील त्रुटीबाबत तसेच ही प्रक्रिया रद्द करून नव्याने राबविण्याबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले.





