मुंबई: महाराष्ट्रात ऑगस्ट २०२४ मध्ये सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून राज्य सरकार पैसे परत घेणार आहे. महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तर देताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. या योजनेच्या छाननीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पात्र नसलेल्या महिलांसोबतच १४,२९८ पुरुषांनी आणि १,५२६ सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता. या अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे ३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे सरकारने मान्य केले आहे. विरोधी पक्षांनी विधानसभेत या योजनेत २६ लाख बोगस लाभार्थी असून ५ हजार १३६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत गदारोळ घातला होता. यावर उत्तर देताना मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, २६.३ लाख अपात्र लाभार्थ्यांचे लाभ जूनपासून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. पुरुषांसह सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली – आदिती तटकरे यांनी सांगितले की, सरकारी कर्मचारी आणि योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुमारे १४.५ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करून रक्कम वसूल करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता आणि गरजू महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा भत्ता दिला जातो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये सरकारने लाभार्थ्यांच्या छाननीची घोषणा केली होती.