सरकारनेच नवसंजीवनी द्यावी; आयओएची आर्थिक मदतीची मागणी

नवी दिल्ली – करोनामुळे जागतिक क्रीडाक्षेत्राला जे नुकसान झाले त्याचा फटका भारतीय क्रीडा संघटनांनाही बसलेला आहे. त्यामुळे आता या संघटनांना किमान 200 कोटींची आर्थिक मदत करून सरकारने नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) केली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी दिली आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा देशभर कहर झाला. त्यामुळे देशात लॉकडाऊनही केले गेले. आता या लॉकडाऊनचा हा चौथा टप्पाही सुरू झाला आहे. या काळात केवळ आयओएचेच नव्हे तर देशातील विविध संलग्न क्रीडा संघटनांचे अतोनात नुकसान झाले आहे. संघटनांशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना स्पर्धाच होत नसल्याने मानधनदेखील देता येत नसून प्रायोजकांनीही स्पर्धा नाहीत तर पैसेही नाही, अशी भूमिका कायम ठेवली आहे.
टोकियो ऑलिम्पिक एक वर्षाने पुढे ढकलले गेल्याने अनेक खेळाडूंना या स्पर्धेत पात्र होण्याची नामी संधी मिळाली असली तरीही त्यापूर्वी सराव तसेच पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठिंब्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. सरकारने जरी मैदाने रिकामी करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सराव करण्यास तसेच स्पर्धांच्या आयोजनाच परवानगी दिलेली असली तरीही येत्या काळात प्रायोजक कसे मिळणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, असे बात्रा यांनी नमूद केले आहे.
देशात जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या आयओएला तसेच विविध क्रीडा संघटनांना सरकारने एकूण जवळपास 200 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा या सर्व संघटनांना मरणासन्न अवस्था येईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सोडा स्थानिक स्पर्धेतदेखील खेळाडू मानधनाशिवाय सहभागी होणार नाहीत. आयओएला किमान 10 ते 15 कोटी तर सर्व क्रीडा संघटनांनादेखील काही कोटी रुपये देण्यात यावे तरच पुढील काळात त्यांचे व्यवस्थापन योग्यरितीने होईल.
टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी होणार असले तरीही त्यापूर्वी संघटनांना स्थानिक स्पर्धा घ्याव्याच लागतील. तसेच ऑलिम्पिकनंतर देखील स्वतःचे अस्तित्व टिकवावे लागणार आहे व त्यासाठी आता प्रायोजकांनी पाठ फिरवल्याने सरकारकडून मिळणारी मदत हाच एकमेव पर्याय समोर आहे. या मागणीचा क्रीडा मंत्रालय निश्चितच विचार करेल व संघटनांना नवसंजीवनी देण्यासाठी मदतीचा हात देईल, अशी आशाही बात्रा यांनी व्यक्त केली आहे.





