Pune District : दुष्काळात सरकारने दिलासा द्यावा
Pune District : आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा हा व्यवसाय एक आर्थिक कणा आहे. त्यासाठी दुधाच्या दारातही वाढ करण्यात यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मंचर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांनी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तहसीलदारांना निवेदन देतेवेळी किसान सभेचे नेते राजू घोडे, गणेश खानदेशे, निलेश बाणखेले, जालिंदर गव्हाणे, नरेंद्र काळे, वरूण तळेघर आदी उपस्थित होते. तहसीलदार राहुल सारंग यांना दिलेल्या निवेदनात युवक अध्यक्ष विशाल वाबळे म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तसेच रोजगाराचा प्रश्न यांचा प्रशासनाने तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात.
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा हा व्यवसाय एक आर्थिक कणा आहे. त्यासाठी दुधाच्या दारातही वाढ करण्यात यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नेते आणि माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व जनतेला प्रत्यक्ष मदत मिळेल, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, तालुक्यातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन पाणी, चारा, रोजगार तसेच पिकांच्या नुकसानीबाबत आवश्यक मदत व उपाययोजना तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यातील युवक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी लावून धरत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
– विशाल वाबळे,युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आंबेगाव तालुका.





