SIM-binding rules: केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) व्हॉट्सॲप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), सिग्नल (Signal) सारख्या ओटीटी (OTT) कम्युनिकेशन ॲप्ससाठी ‘सिम-बाइंडिंग’चे अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांमुळे या ॲप्सच्या सक्रिय वापरकर्त्यांच्या (Active Users) संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभागाने (DoT) सर्व ओटीटी कम्युनिकेशन ॲप्सना पुढील ९० दिवसांत ‘सिम-बाइंडिंग-टू-डिव्हाइस’चे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा थेट अर्थ असा की, ज्या सिम कार्ड आणि मोबाईल नंबरने तुम्ही पहिल्यांदा ॲपवर अकाउंट रजिस्टर केले आहे, ते सिम कार्ड तुमच्या डिव्हाइसमध्ये ( मोबाईल) सतत असणे बंधनकारक असेल. मुख्य नियमांचे काय आहेत परिणाम? DoT च्या या निर्देशांचा सर्वात मोठा परिणाम ॲप्सच्या वापराच्या पद्धतीवर होणार आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप रजिस्टर केलेले मूळ सिम कार्ड नसेल, तर ते कम्युनिकेशन ॲप चालूच दिले जाणार नाही. व्हॉट्सॲप, टेलिग्राम सारख्या ॲप्समध्ये एकाच अकाउंटला अनेक डिव्हाईसवर (लॅपटॉप किंवा आयपॅड) वापरण्याची सुविधा असते. या नव्या नियमांनुसार, लॅपटॉप किंवा इतर ‘साथीच्या डिव्हाइस’ (Companion Device) वर असलेले अकाउंट दर सहा तासांनी आपोआप लॉगआउट होईल. युजरला पुन्हा लॉग-इन करण्यासाठी QR कोड स्कॅन करून लॉग-इन करावे लागेल. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांनुसार, हे नियम लागू झाल्यास व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात घटेल. सिम कार्ड डिव्हाइसला सतत जोडलेले ठेवण्याच्या बंधनामुळे विदेशात प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचे भारतीय नंबर आपोआप बंद होण्याची शक्यता आहे. काही कंपन्यांमध्ये ऑफिसमध्ये फोन घेऊन जाण्याची परवानगी नसते. अशा परिस्थितीत लॅपटॉपवर दर सहा तासांनी लॉग-इन करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे व्यवसायाच्या कामात मोठा अडथळा निर्माण करेल. दूरसंचार उद्योगातील एका अधिकाऱ्याच्या मते, ग्रामीण भागातील युजर्स अनेकदा एका ऑपरेटरच्या सिमने अकाउंट तयार करतात, पण डेटा दुसऱ्या ऑपरेटरच्या सिमने वापरतात. या नव्या नियमांमुळे त्यांच्यासाठी ॲप वापरणे खूपच कठीण होईल. दूरसंचार विभागाने हे नियम ‘टेलीकॉम ओळख, डिव्हाइस, नेटवर्क आणि सेवेचा गैरवापर रोखण्यासाठी’ आणि ‘टेलीकॉम सायबर सुरक्षा’ मजबूत करण्यासाठी लागू केले आहेत.