नाचक्कीच्या भीतीमुळेच सरकारने पळ काढला; राहुल गांधी यांचा केंद्रावर घणाघात

नवी दिल्ली – कृषी कायदे परत घेताना या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे होती; परंतु सरकारने चर्चेपासून पळ काढला. संसदेत सरकारची आणखी नाचक्की होईल अशी भीती वाटल्यामुळेच सरकारने पळ काढला. हे तर “डरपोक’ सरकार आहे, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी तिन्ही कृषी कायदे परत घेण्याच्या पद्धतीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार केंद्र सरकारने आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायदे परत घेणारे विधेयक मंजूर केले; परंतु ज्या पद्धतीने हे विधेयक पारित केले गेले त्यावर तीव्र आक्षेप घेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधानांनी देशाची क्षमा मागत कृषी कायदे परत घेण्याची हमी दिली होती. अर्थात, पंतप्रधानांनी आपली चूक मान्य केली. मात्र, या चुकीचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागले. आंदोलनात 700 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. गृह राज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून अनेकांचे प्राण घेतले. या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी होती. एमएसपीवर चर्चा होणे गरजेचे होते. परंतु, सरकारने चर्चेपासून पळ काढला, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले की, तीन-चार उद्योगपतींच्या ताकदीपुढे या देशातील सामान्य माणसाला दाबले जाऊ शकते. परंतु, मूठभर व्यापारी आपल्याला दाबून ठेवू शकत नाही ही बाब शेतकऱ्यांच्या आंदालनाने स्पष्ट केली आहे. गरीब, शेतकरी, मजूर हे शक्तीहीन आहेत हा सरकारचा भ्रम आता दूर झाला असेल, असा टोमणा सुद्धा त्यांनी मारला.





