उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सांत्वन
पिंपरी – सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराज जगताप याच्या कुटुंबीयांना दिली. रविवारी (दि. 14) दुपारी पवार यांनी पिंपळे सौदागर येथे जाऊन विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, अशोक बॅंकेचे अशोक शीलवंत या वेळी उपस्थित होते.
पिंपळे सौदागर येथे प्रेमप्रकरणातून विराजचा 7 जून रोजी सहा जणांनी खून केला. या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली. अनेक राजकीय नेत्यांनी विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विराजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासाबाबत माहिती घेतली. विराज याच्या कुटुंबीयांनीही पोलीस तपासाबाबत समाधानी असल्याचे पवार यांना सांगितले.
आपण पोलीस आयुक्त यांच्याशी तपासाबाबत बोललो आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे. विराज याच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी कोणता वकील पाहिजे, अशी विचारणा पवार यांनी जगताप कुटुंबीयांकडे केली. आपल्याला पाहिजे असलेल्या काही वकिलांची नावे द्या शासन तो वकील आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
रविवारी सकाळी पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थांची एक बैठक झाली. आमच्या गावात कोणताही जातीय तणाव नाही, असे जगताप कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री पवार यांना सांगितले.