माद्रिद – भारताच्या विनेश फोगट व दिव्या काक्रन यांनी स्पेन ग्रां.प्रि. कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. या दोन पदकांबरोबरच भारताने एक रौप्य व तीन ब्रॉंझपदकेही जिंकली.
विनेशने 53 किलो गटात जस्टीना बेनिट्स (पेरू) व निना मिंकेनोवा (रशिया) यांच्यावर विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत तिने डच खेळाडू जेसिका ब्लाझका हिचा चुरशीच्या झुंजीनंतर पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या दिव्याने 68 किलो गटाच्या अंतिम लढतीत पोलंडच्या पोलंडच्या अग्निझेका कोर्डुस हिला सहज पराभूत केले.
जागतिक स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेती पूजा धांडा हिला 57 किलो गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पोलंडच्या इव्होना मॅटकोवस्का हिने तिचा पराभव केला. भारताला सीमाकुमारी (50 किलो), मंजुकुमारी (59 किलो) व किरणकुमारी (76 किलो) यांना ब्रॉंझपदक मिळाले. ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साक्षी मलिकने दुखापतीच्या कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताने 130 गुणांसह सांघिक उपविजेतेपद मिळविले. रशियाने 165 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले.