गोंदवले – पोलिसांच्या वर्दीतही अनेक हळव्या मनाचे कर्मचारी काम करत असतात हे शिंगणापूरमध्ये घडलेल्या घटनेतून स्पष्ट झाले. दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणारे अमोल चांगण यांनी आपल्या स्वखर्चाने एका निराधार महिलेवर शस्त्रक्रिया करून तणावाच्या काळातही संवेदनशीलता जपली आहे.
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिरात यमुनाबाई कलावंत या अनाथ महिला अनेक वर्षांपासून महादेवाची सेवा करतात. त्यांना कोणीही नातेवाईक नाहीत. मंदिरातील सेवेत मग्न असून महादेवाचे मंदिरच त्यांच्या जगण्याचा आधार बनलं. त्यामुळे अनेक लोकानी त्यांना मंदिर परिसरात पाहिलेलं आहे. मंदिराच्या परिसरात पाय घसरून पडल्याने त्यांचा खुबा मोडला. दररोज मंदिरात दिसणाऱ्या यमुनाबाई अचानक दिसायच्या बंद झाल्या. सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली.
माहिती घेताना यमुनाबाई 20 दिवसांपासून उपचाराअभावी होत्या, हे त्यांना समजले. कावडे यांनी शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत कर्मचारी अमोल चांगण यांना ही माहिती दिली. चांगण यांनी यमुनाबाई यांच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाची माहिती घेतली. निराधार व्यक्ती असल्याने त्यांनी डॉंक्टरांना विनंती केली. कमी मोबदल्यात शस्त्रक्रिया करण्याचा शब्द डॉक्टरांनी दिला. आर्थिक मदतीसाठी चांगण यांनी पुढाकार घेत शासकीय मदत मिळवली. शस्त्रक्रियेच्या दिवशी स्वतःच्या घरातील व्यक्ती असल्याप्रमाणे ते हॉस्पिटलमध्ये थांबून होते. यमुनाबाई यांना देवमाणूस म्हणून वर्दीतील देवच भेटला.
कर्तव्य व भक्तीचा संगम
अमोल चांगणसुद्धा शंभू महादेवाची भक्ती करतात. चैत्र यात्रेला शंभू महादेवाच्या कावडी सोहळ्यात ते आपली कावड घेऊन सोहळा साजरा करतात. एकीकडे प्रशासकीय कर्तव्य म्हणून पोलिस यंत्रणेत आपले कर्तव्य तर दुसरीकडे शंभू महादेवाची भक्ती या दोन्ही कामे चांगल्याप्रकारे निभावत असतात. सहाय्य पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी करू शकलो, असे श्री. चांगण सांगतात.