Devendra Fadnavis : राज्यातील सरकार हे महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरुच ठेवणार असून पुढील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये एक कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दीष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अहमदपूर, उदगीर, रेणापूर आणि इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला फडणवीस संबोधित करत होते. विविध नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. सध्या राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मदत दिली जाते. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही ठरवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत आहोत, यावर्षी निम्मे लक्ष्य पूर्ण होईल, उर्वरित लक्ष्य हे आगामी दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. याबरोबरीने फडणवीसांनी राज्य सरकारच्या विकास योजनांविषयी सांगताना, ग्रामीण भाग हा आमचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. देशात जवळपास सात लाख गावे आहेत. पण, आता छोटी शहरे देखील झपाट्याने विकसीत होत असून यामध्ये सुमारे साडे सहा कोटी जनता राहते. त्यामुळे ही शहरे देखील विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची आहेत. अशा शहरांकडे दुर्लक्ष केले गेले. चांगल्या राहणीमानासाठी व रोजगारासाठी अनेक नागरिक खेड्यांमधून छोट्या शहरांमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे अशा शहरांना सध्या स्वच्छता, पाणी, पायाभूत सुविधा आशा आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशाच छोट्या शहरांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 50 हजार कोटींच्या निधीची तरतुद केली असून, अशा छोट्या शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही काम करत असल्याचे देखील फडणवीसांनी बोलताना स्पष्ट केले.