Mega Sale Fraud: मेगा सेलच्या झगमगाटात फसवणुकीचा धोका; स्वस्त वस्तुंचा मोह पडू शकतो महागात
Mega Sale Fraud: भरघोस सवलतींच्या जाहिराती, सदोष वस्तूंची विक्री, परताव्यासाठी टोलवाटोलवी

पिंपरी – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीच्या विविध माध्यमांवर मेगा सेल, विशेष सवलती आणि मर्यादित कालावधीतील आकर्षक ऑफर्सचा वर्षाव सुरू आहे. दरवर्षी अशा आॅफर्सच्या जोरावर इ-काॅमर्स साइट्स कोट्यवधींचा व्यवसाय करतात.
मागील वर्षी दिवाळीच्या काळात ई-काॅमर्स साइट्सने सव्वा लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. यंदा तो दीड लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. परंतु आॅफर्सच्या झंझावातात अनेकदा फसवणूक होण्याचीही शक्यता असते.
मोबाइल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, घरगुती वस्तू आणि इतर उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याने ग्राहक ऑनलाइन खरेदीला पसंती देत आहेत. मात्र, कमी किमतीचे आकर्षण, उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत अपुरी माहिती, सदोष वस्तुंची डिलिव्हरी आणि परतावा मिळण्यास होणारा विलंब अशा समस्यांमुळे ग्राहकांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीतील आकर्षक जाहिराती आणि प्रत्यक्ष व्यवहार यांतील फरक ओळखणे महत्त्वाचे ठरत आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत सवलत, विशेष मेगा सेल आणि मर्यादित काळासाठी स्वस्त दर अशा जाहिराती केल्या जातात. काही ऑफर्स खरोखरच फायदेशीर असतात; मात्र प्रत्येक सवलत ग्राहकांसाठी लाभदायक असेलच असे नाही. मूळ किंमत, सवलतीनंतरची किंमत, उत्पादनाची गुणवत्ता आणि विक्रेत्याची विश्वासार्हता तपासल्याशिवाय खरेदी केल्यास ग्राहकांची निराशा होऊ शकते. विशेषतः बाजारभावापेक्षा असामान्यरीत्या कमी किमतीत वस्तू मिळत असल्यास अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
वस्तू मिळाल्यानंतर अडचणींचा सामना
ऑनलाइन मागवलेली वस्तू प्रत्यक्षात वेगळी निघणे, खराब किंवा सदोष उत्पादन मिळणे, बनावट वस्तूची डिलिव्हरी होणे अथवा पार्सलमध्ये अपेक्षित वस्तू नसणे, अशा तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. जाहिरातीतील छायाचित्रे आणि प्रत्यक्ष उत्पादन यांत फरक आढळल्यासही ग्राहकांची निराशा होते.
काही प्रकरणांमध्ये वस्तू परत केल्यानंतर परताव्याची प्रक्रिया लांबते किंवा ग्राहकांना तक्रारीच्या निवारणासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. मात्र, प्रत्येक विलंब हा फसवणुकीचाच प्रकार असेल असे नाही. संबंधित व्यवहार, परतावा धोरण आणि तक्रारीची परिस्थिती तपासणे आवश्यक आहे.
परतावा नाकारल्यास काय करावे?
ग्राहकाने खरेदी केलेली वस्तू सदोष, चुकीची किंवा वर्णनापेक्षा वेगळी असल्यास संबंधित विक्रेता अथवा खरेदीच्या माध्यमाकडे अधिकृत पद्धतीने तक्रार नोंदवावी. तक्रार करताना ऑर्डर क्रमांक, बिल, पैसे भरल्याचा पुरावा, वस्तूची छायाचित्रे आणि विक्रेत्याशी झालेल्या संभाषणाच्या नोंदी जतन कराव्यात.
पार्सल उघडतानाचा सलग व्हिडिओ रेकॉर्ड केल्यास तो महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या व्हिडिओमध्ये पार्सलवरील ए.डब्ल्यू.बी. (AWB) क्रमांकाचे लेबल, पॅकिंग आणि वस्तूची स्थिती स्पष्ट दिसणे उपयुक्त ठरते. मात्र, व्हिडिओमुळे परतावा हमखास मिळतोच असे नाही.
तक्रार करूनही समाधान न मिळाल्यास संबंधित कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे दाद मागता येते. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या १९१५ या क्रमांकावर संपर्क साधता येतो किंवा अधिकृत ग्राहक तक्रार व्यवस्थेचा वापर करता येतो.
आवश्यकतेनुसार ग्राहक आयोगाकडेही तक्रार दाखल करता येते. आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर तातडीने संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.
खरेदीपूर्वी खबरदारी हाच बचाव
ग्राहकांनी केवळ मोठ्या सवलतीकडे न पाहता उत्पादनाचे तपशील, विक्रेत्याचे रेटिंग, ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि परतावा धोरण तपासावे. पार्सल मिळाल्यानंतर त्याची स्थिती पाहावी आणि महागड्या वस्तूंसाठी पुरावे जतन करावेत. तसेच, अॅपच्या बाहेर पैसे भरण्याची विनंती, अनोळखी लिंक आणि गोपनीय बँक माहिती मागणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे.
सणासुदीच्या खरेदीत सवलतींचा लाभ घेणे चुकीचे नाही; मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळून जागरूकपणे व्यवहार करणे गरजेचे आहे. आकर्षक जाहिरातींपेक्षा वस्तूची गुणवत्ता, व्यवहाराची सुरक्षितता आणि ग्राहकांचे हक्क यांना प्राधान्य दिल्यास आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते.
Rashtriya Swayamsevak Sangh: संविधान संवर्धनासाठी स्वयंसेवकांनी सज्ज व्हावे





