पुणे जिल्हा | वीटभट्टी कामगाराच्या घरातून मुलीला पळविले
जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील धालेवाडी विघ्नहर साखर कारखाना येथील एका वीट भट्टी कामगाराच्या तीन वर्षांच्या मुलीला दि. १७ रोजीच्या रात्री राहत्या घरातून अनोळखी व्यक्तीने पळवून नेले असून तिचा शोध सुरू आहे.
रोशनी गणेश भिलाला (मूळ राहणार भामोरी देवास, मध्यप्रदेश. सध्या राहणार धालेवाडी जुन्नर) असे या मुलीचे नाव आहे. तिचे कुटुंबीय धालेवाडी येथील एका वीट भट्टीवर कामाकरिता असून तेथील खोल्यांमध्ये ते सर्वजण राहत होते.
सोमवारी रात्री घरात सर्वजण झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास रोशनी तेथे नसल्याची खात्री झाल्यानंतर तिचे वडील व स्थानिक ग्रामस्थांनी आजूबाजूला सर्वत्र शोध घेऊनही ती सापडू शकली नाही. रोशनी तीन वर्षांची असून तिची उंची ३ फूट, केस लांब, रंग सावळा, अंगामध्ये हिरवट रंगाचा फ्रॉक व लाल रंगाची पॅन्ट घातली आहे.
या लहानग्या मुलीला अनोळखींनी पळवून नेल्याची तक्रार जुन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षक किरण अवचर, वन विभागाचे प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धालेवाडी परिसरात तसेच उसाच्या शेतात शोध घेऊनही ही मुलगी अजून सापडू शकली नाही.





