satara | मी पाणी आणल्याचा पोटशूळ उठल्यानेच आंदोलनाची नौटंकी

सातारा, (प्रतिनिधी) – खटाव आणि माण तालुक्यामध्ये कधीच दुजाभाव केला नाही. ‘टेल टू हेड’ पाणी देण्याचा कायदा असूनही, खटावला पाणी देण्याला नेहमी प्राधान्य दिले आहे. आताही उरमोडीचे पाणी कळंबीपासून वडूज परिसरातील सातेवाडी भागात वाहत आहे. येरळा नदीतही जिहे-कठापूर योजनेतून पाणी येईल, तितके पाणी नेर धरणातून सुरू आहे.
त्यानंतरही काही नेहमीचे आंदोलक वडूजमध्ये आंदोलनाची नौटंकी करत आहेत. त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांना पाणी आणायचे सोडा, पण एकही विकासकाम करता आले नाही, अशी घणाघाती टीकी आ. जयकुमार गोरे यांनी वडूज येथे रविवारी पत्रकार परिषदेत केली.
नगराध्यक्ष मनीषा काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, शशिकांत पाटोळे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, मी आमदार झाल्यापासून खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जात आहे. हजारो हेक्टरवरील लाखो टन ऊस तालुक्यातील कारखान्यांना जात आहे.
तारळी योजनेचे पाणी येत आहे. अथक प्रयत्नांनंतर जिहे-कठापूरचे पाणी येत आहे. इतके होत असताना खटाव तालुक्यात आंदोलनाची नाटके करणार्यांनी कधी कौतुकाचा शब्द काढला नाही. खटाव आणि माण तालुक्यात वाद निर्माण करून, अस्तित्व टिकवण्याची धडपड करणार्यांच्या बागायती शेतीला पाणी मिळतेय.
शेतकर्यांचा खोटा कळवळा आणणारे पाण्याची चोरी करत आहेत. येरळा नदीत अनेक वेळा नेर धरणातून पाणी सोडले आहे. माणला पहिल्यांदाच फक्त 0.17 टीएमसी पाणी नेले, तर खटाववर अन्याय केल्याचे चित्र उभे केले जात आहे.
मी पाणी आणलेय याचा पोटशूळ आंदोलन करणार्यांना उठला आहे. मी गेल्या 11 वर्षांपासून लागेल तेव्हा पाणी आणतोय, विकासनिधीची लोकसंख्येच्या निकषावर 60 आणि 40 टक्के विभागणी करतोय. पाणी देण्यात खटावला प्राधान्य देतोय, हे जनतेने वारंवार घरी बसवलेल्यांना बघवत नाही. औंधसह 22 गावांच्या पाण्याचा विषय मी विधानसभेत मांडताच या आंदोलकांनी नाटके केली. त्या भागात पाण्याची तरतूद मी करुन घेतली आहे.
पाणी आणि विकासाचा अजेंडा घेऊन मी काम करतो. मला आमदार करणारे समाधानी असून, ते माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी मला कायम विरोध केलाय, त्यांना मला जाब विचारायचा अधिकार नाही. तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी आणि विकासासाठी कुणी काय केले याचा लेखाजोखा एका व्यासपीठावर मांडण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
‘त्यांनी’ तालुक्याची अस्मिता विकली
रणजित देशमुखांच्या भागातील अनेक गावांत पाणी नव्हते, तरी त्यांनी आंदोलने केली नाहीत. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून, सूतगिरणीसाठी भागभांडवल मिळवण्यातून त्यांना वेळ नव्हता. त्यातील गोलमाल लवकरच बाहेर काढावा लागणार आहे.
भ्रष्टाचार करता यावा म्हणून, चारा छावण्यांसाठी त्यांची आंदोलने आता सुरू होतील. प्रभाकर देशमुख यांना जवळचे नेते सांभाळता येत नाहीत. खटावच्या अस्मितेच्या बाता मारणार्यांनी मागच्या निवडणुकीत देशमुखांकडून पैसे घेऊन, तालुक्याची अस्मिता विकली होती, असा टोला आ. गोरेंनी लगावला.





