पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सलग दुसरी सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 25) तहकूब करण्यात आली. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा तहकूब करण्यात आल्याचे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केले.
महापालिकेची 20 जुलै रोजीची सभा आजपर्यंत (गुरुवार) तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा दुपारी 1 वाजता सुरू झाली. शहरात कचऱ्याच्या समस्येचा विषय गंभीर बनला आहे. याशिवाय शहरातील विविध समस्यांविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये तीव्र भावना आहेत. नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून 20 जुलै रोजी सभा तहकूब करण्यात आली होती. तर आज शीला दिक्षीत यांच्या निधनाचे कारण देवून सभा तहकूब केल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी आहे.