Pune District : वैष्णवांचा मेळा लोणी काळभोरमध्ये विसावला
Pune District : पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी विठ्ठलनामाचा अखंड गजर करीत पंढरीच्या दिशेने उत्साहाने मार्गक्रमण करत होते.

लोणी काळभोर : ‘ज्ञानोबा… तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण लोणी काळभोर परिसर शनिवारी भक्तिरसात न्हाऊन निघाला. पुण्यातील मुक्काम आटोपून लाखो वारकर्यांसह जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर-कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळावर सायंकाळी दाखल झाला. पालखीच्या आगमनाने पंचक्रोशीत जणू भक्तीचा महासागर उसळला होता.
पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात सकाळी विधिवत पूजनानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी रथात विराजमान करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा पुलगेटमार्गे हडपसरकडे मार्गस्थ झाला. गाडीतळ येथे अल्पविराम घेतल्यानंतर सोहळा पुणे-सोलापूर महामार्गाने पुढे निघाला. शेवाळेवाडी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त स्वागतानंतर मांजरी बुद्रुक येथे दुपारचा विसावा झाला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी विठ्ठलनामाचा अखंड गजर करीत पंढरीच्या दिशेने उत्साहाने मार्गक्रमण करत होते.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात संतांच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्या शीतल कांबळे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, सुषमा मुरकुटे, कृषिराज चौधरी, कोमल कांबळे, नगरसेविका हेमलता मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाब चौधरी, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिरखान पठाण, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, श्रीकांत वाव्हळ, माजी उपसरपंच देविदास कदम, सुशील महाराज काळभोर, गौरव काळभोर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर पालखी लोणी स्टेशन चौकात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जयघोषात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी लोणी काळभोर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष सचिन काळभोर आणि माजी सरपंच नंदू काळभोर यांनी पालखीचे स्वागत केले. अल्प विश्रांतीनंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर मुक्कामी दाखल झाली. सार्वजनिक आरतीनंतर विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भाविकांनी संतांच्या पालखीचे दर्शन घेतले.
रात्रभर सुरू असलेल्या भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. अनेक दिंड्यांनी गावातील मंदिरे, शाळा, महाविद्यालये आणि पारंपरिक मुक्कामस्थळी विश्रांती घेतली. संपूर्ण सोहळा शांततेत पार पडावा यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
वारकर्यांच्या सेवेसाठी लगबग
वारकर्यांच्या सेवेसाठी ग्रामपंचायत लोणी काळभोर, ग्रामपंचायत कदमवाकवस्ती, पंचायत समिती हवेली, समस्त कवडीपाट माळवाडी मित्र मंडळ, रेनबो इंटरनॅशनल स्कूल, संजय नर्सरी, अखिल कदमवाकवस्ती व लोणी काळभोर शिवसेना, श्री गणेश मित्र मंडळ आदी संस्थांच्या वतीने फराळ, फळे, चहा-बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच रोहन सपकाळ आणि बाळासाहेब सपकाळ यांनी परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांच्या पालखीला बांबूची शिडी अर्पण करून वारीची परंपरा जपली.
एकादशीच्या निमित्ताने फराळवाटप
योगिनी एकादशीच्या निमित्ताने अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठान, विश्वरत्न फाउंडेशन, संत निरंकारी मंडळ, शीतलाशक्ती मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, संत रोहिदास चॅरिटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरुण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठान, राजा शिवछत्रपती तरुण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरुण मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ तसेच मुस्लिम आणि शीख समाजबांधवांनी वारकर्यांना चहा, खिचडी, चिवडा, केळी आणि उपवासाचे पदार्थ वाटप करून सेवाभाव जपला.





