नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या फेक वेबसाईटचा वापर करुन नागरिकांनी बनावट मतदार ओळखपत्रे तयार करुन विकणारी एक टोळी सुरतमध्ये गुजरात पोलिसांनी पकडली आहे. ही ओळखपत्रे वापरुन बॅंकांमधून कर्ज घेतले जात होते. त्यानंतर असा ओळखपत्रधारक पुन्हा बॅंकेत फिरकत नसे. तसेच मोबाईलच्या सिमकार्डसाठीही हे ओळखपत्र वापरले जात होते.
सुरत पोलिसांनी सांगितले की, काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बॅंकांमधून कर्ज मिळवले आणि कर्जाचे हप्तेही भरले नाहीत, अशी तक्रार एका खासगी क्षेत्रातील बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार दोन आठवड्यांपूर्वी तपास सुरू करण्यात आला आणि सहा जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यावरुन असे स्पष्ट झाले आहे की, सुरत शहरात आधार आणि पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र यांसारखी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करण्यासाठी वेबसाइटचा वापर केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी आधार आणि पॅन कार्ड यांसारखी सुमारे दोन लाख ओळख पुरावा कागदपत्रे बनवली आणि ती प्रत्येकी 200 रुपयांना विकली.
सुरत आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले की, अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी शहरात कार्यरत असल्याचा सुगावा लागला होता. मात्र, बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर बनावट कागदपत्रांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोलिस पोहोचले. त्यामुळे हे काम करणारे सर्व सूत्रधार पकडता आले. या प्रकरणी सोमनाथ प्रमोद कुमार (गंगानगर) आणि प्रेमवीर सिंह ठाकूर, (उन्नाव) दोघेही उत्तर प्रदेश या दोघांना अटक करण्यात आली आहे.