जामखेड, (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वीच श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 3 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता येत्या आठवडाभरात येणार असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी माझे जे कर्तव्य आहे ते पार पाडेल, त्यात कुठलाही कसूर राहणार नाही. नागेश्वर मंदिराची हक्काची जागा जसजसी उपलब्ध होईल, तसातसा या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी माझी असेल, अशी ग्वाही आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली. जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर योत्रोत्सवानिमित्त नागेश्वर मंदिर परिसरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या सप्ताहाची सांगता ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. आमदार शिंदे यांनी काल्याच्या कीर्तनास हजेरी लावली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 2019 मध्ये मंत्री असताना मंदिर परिसराच्या विकासासाठी दीड कोटींचा निधी दिला होता. परंतु तो निधी येथे येऊ शकला नाही, कारण तेव्हा मी निवडणूक हरलो परंतु पुढे संबंधिताकडून जी कार्यवाही करणं अपेक्षित होती ती झाली नाही. परंतु श्री नागेश्वराच्या आणि तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने मी पुन्हा आमदार झालो. आमदार होताच जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 3 कोटींचा निधी दिला आहे. त्याचबरोबर शहरातील इतरही धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.