बीजिंग : चंद्रावरच्या मातीमध्ये पाण्याचे अंश आढळल्यामुळे तेथे कोणेएके काळी पाण्याचे अस्तित्व असल्याचा दावा अधिक प्रबळ झाला आहे. चँग- इ-५ या चीनच्या अंतराळ यानाने चंद्राच्या पृष्ठभागावरून आणलेल्या मातीच्या नमुन्यांमध्ये पाण्याचे अंश आढळले आहेत. या नमुन्यांचा सध्या संशोधकांकडून अभ्यास केला जातो आहे, असे चायनीस ऍकेडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. चंद्रावरून आणलेल्या मातीच्या नमुन्यांमध्ये पाण्याचे सुक्ष्म अंश आढळले असल्याचे सीएएसने म्हटले आहे. बीजिंग नॅशनल लॅबोरेटरी फॉर कंडेन्सड मॅटर फिजिक्स आणि इन्स्टिट्युट ऑफ फिजिक्स ऑफ सीएएस या दोन प्रमुख संस्थांबरोबर देशांतल्या अन्य काही संशोधन संस्थांकडून सुरू असलेल्या या संशोधनाचा निबंध नेचर ऍस्ट्रोनॉमी या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. चॅंग इ-५ ची चांद्र मोहीम २०२० मध्ये सुरू झाली. २००९ साली भारताच्या चांद्रयान-१ अंतराळयानाने चंद्रावर पाण्याचे अंश शोधून काढले होते. चंद्रावरच्या सूर्यप्रकाश पडणाऱ्या भागात हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रेणूंच्या स्वरुपात हे अंश आढळून आले होते. त्यावेळी खडकातील पाण्याचे अंश शोधून काढण्यासाठी नासाच्या मून मिनरोलॉजी मॅपर या अत्याधुनिक उपकरणाच्या वापराने हा दावा केला गेला होता. २०२० मध्ये स्ट्राटोस्फेरिक ऑब्जर्व्हेटरीने इन्फ्रारेड किरणांच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील अतिविशाल विवरामध्ये पाण्याचे अंश सापडल्याचा दावा केला होता. मात्र उंचावरच्या मातीच्या नमुन्यांमध्ये ऑक्सिजन किंवा हायड्रोजनचे अंश आढळले नव्हते. चीनचे संशोधक चंद्रावरील दगड-मातीच्या एक हजार प्रतींचा अभ्यास करत आहेत. त्यामध्ये पातळ पापुद्रे, काही अज्ञात संरचना असलेले खडक देखील आहेत. त्यात पाण्याचे रेणू आढळले आहेत. हे पाण्याचे रेणू जमिनीवरच्यो स्रोतातून किंवा रॉकेटच्या धुरामुळे जमले असल्याची शक्यता संशोधकांनी फेटाळली आहे. या मातीच्या नमुन्यांचा अधिक सखोल अब्यास केल्यावर पाण्याच्या अंशाबाबतचे अधिक सबळ पुरावे मिळतील, अशी आशाही काही संशोधकांनी व्यक्त केली आहे. अधिक व्यापक संशोधन होणे गरजेचे… चांगई-५ चीनच्या पहिल्या चंद्राच्या रिटर्न मिशनने २०२० मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा पहिला ऑन-साइट पुरावा पाठवला होता. गेल्या महिन्यात चॅंगइ-६ ने पृथ्वीवर परत पाठवलेल्या २ किलो नमुन्यांमधून याबाबतचे अधिक संशोधन केले जाणार आहे.