पुणे जिल्हा | यशवंत पतसंस्थेचा पाया भक्कम

पिंपळवंडी, (वार्ताहर) – यशवंत नागरी पतसंस्था भक्कम पायावर उभी राहिली असून भविष्यात इतर बँकांच्या स्पर्धेत आपली पतसंस्था उभी राहिली पाहिजे, अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे असे यशवंत नागरी पतसंस्थेचे चेअरमन महादेव वाघ यांनी नमूद केले.
पिंपळवंडी येथील श्री मळगंगा मातेच्या मंदिरातील सभागृहात रविवारी (दि. 25) पार पडलेल्या पतसंस्थेच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वाघ बोलत होते.
यावेळी शिवाजी काकडे, अॅड. डिंपल घाडगे, कृषी उत्पन्ना बजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, डी. सी. जाधव, मंगेश काकडे, भास्कर बांगर, सरपंच मेघा काकडे, उपसरपंच मयूर पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप लेंडे, सिताराम अभंग, हेमलता सोनवणे,
कल्पना बांगर, सचिन शेलोत, उत्तमराव वाकचौरे, अनिल ठुबे, टी. आर. वामन, सुप्रिया लेंडे, दादाभाऊ काकडे, पोलीस पाटील इरफान तांबोळी, संपतराव लोहोटे, नंदा वाघ, वृषाली गवळी, अनिता कोकाटे, जानकु तोतरे गुरुजी, संगीता वाघ, छाया कालेकर, चंद्रकला घोटणे यांच्यासह संचालक, सभासद, सेवक वृंद उपस्थित होते.
दरम्यान, पतसंस्थेच्या सभेची सुरुवात राष्ट्रगीत, यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन करून झाली. राजगुरूनगर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी पतसंस्थेला व सभासदांना मार्गदर्शन केले.
महादेव वाघ म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील पतसंस्थांची परिस्थिती अतिशय चांगली आहे. तालुक्यातील दोनच पतसंस्था अडचणीत आल्या; परंतु त्यापैकी एक पतसंस्था सुरू झाली असून दुसरी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु मल्टीस्टेट बँका बंद पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
यशवंत नागरी पतसंस्थेचे 45 कोटी इतर बँकात ठेवलेले आहे. त्याच्यावर टीडीएस लागतो, परंतु आम्ही सभासदांचा टीडीएस कापलेला नाही. कर्ज वाटप करताना भावनेच्या भरात आमच्याही चुका होतात.
त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतो. माता मळगंगेचे शक्तिस्थान मानणारे आम्ही असून यशवंत पतसंस्थेत काही चुकीचे घडणार नाही असा विश्वास पतसंस्थेवर ठेवा, असे त्यांनी नमूद केले.
यशवंत नागरी पतसंस्थेने सामाजिक भान राखत शैक्षणिक, शेती यासह विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या वैभवी फुलसुंदर, साधना जाधव, शशिकांत घाडगे संजय वाघ जयसिंग वायकर यांचा सन्मान केला. संस्थेचे सल्लागार लक्ष्मण मंडलिक यांनी मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचन करून सूत्रसंचालन केले तर संचालक संजय वाघ यांनी आभार मानले.
…तर निर्लज्ज बनावे लागेल
आयुष्यात पैसा हे काही अंतिम ध्येय नाही. पतसंस्थेचे नुकसान करायचे असेल तर निर्लज्ज बनावे लागेल किंवा आत्महत्या करावी लागेल. ज्यावेळी इतक्या पातळ कातडीचे लोक संस्थेत काम करतात त्यावेळी त्यांना त्यांचे कुटुंब, स्वतःचा नावलौकिक सांभाळावा लागतो.
पैसे घेऊन कुठे पळणार आहात. आर्थिक बाबतीत न्यायालयाची भूमिका अत्यंत कडक आहे. त्यामुळे यशवंत नागरी पतसंस्थेकडून सभासदांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेतली जाते, असे महादेव वाघ यांनी नमूद केले.
संस्थेची आर्थिक परिस्थिती 31 मार्च 2024 अखेर
सभासद संख्या : 5970
अधिकृत भाग भांडवल : 5 कोटी
वसूल भाग भांडवल : 4 कोटी 80 लाख 13 हजार
निधी : 16 कोटी 89 लाख 34 हजार
गुंतवणूक : 44 कोटी 7 लाख 88 हजार
ठेवी : 87 कोटी 90 लाख 26 हजार
कर्ज वसुली : 86 टक्के
ऑडिट वर्ग : अ




