नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा पायंडा लोकशाहीसाठी घातक – नवाब मलिक

मुंबई – सोमवारी काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भूमिका योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नसून असा पायंडा पडला नाही पाहीजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली.
आपली भूमिका मांडताना नवाब मलिक म्हणाले की, नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करत असताना दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर उतरतात. लोकशाहीमध्ये विरोधाचा अधिकार असताना सरकार किंवा न्यायालयाने निश्चित करुन दिलेल्या जागेवरच निदर्शने करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे.
त्यामुळे कोणत्याही राजयकी पक्षाने इतर पक्षांच्या नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारणे योग्य होणार नाही. प्रत्येक पक्षाने याबाबत विचार करावा, अशी आमची भूमिका आहे. अशा आंदोलनामुळे पोलिस यंत्रणेवर ताण येतो आणि त्यातून वेगळी परिस्थिती उद्भवते. यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाने बैठक घेऊन याबाबत ठोस निर्णय घेतला पाहीजे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जे काही म्हटले, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केलेला आहे. विशेषत: संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. पण नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा पायंडा लोकशाहीसाठी घातक असून यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लोकशाहीत अशा आंदोलनाला मान्यता देता येणार नाही, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.





