रत्नागिरी : कोकणात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीने वर्चस्व गाजवल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. ऐन निवडणूक काळातच रमेश कदम यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदारच आता शरद पवारांना सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या कदम यांच्या निर्णयामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का मानला जात आहे. “आता माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची गरज उरली नाही” आपल्या राजीनामा पत्रातून रमेश कदम यांनी पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षासाठी आयुष्यभर काम करूनही, अडचणीच्या काळात योगदान देऊनही आपल्याला एकाकी पाडण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. “आता पक्षाला माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याची गरज राहिली नसावी,” अशा शब्दांत त्यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे. पराभवानंतर राजकीय अस्वस्थता चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या रमेश कदम यांनी अलीकडेच नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही पक्षासाठी दिलेले योगदान, लढवलेल्या निवडणुका आणि आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द यांचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे. पुढील राजकीय भूमिका काय? रमेश कदम यांच्या या निर्णयानंतर ते पुढे कोणती राजकीय भूमिका घेतात, कोणत्या पक्षात प्रवेश करतात की सक्रिय राजकारणातून काही काळ दूर राहतात, याकडे आता संपूर्ण कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी मोठा धक्का मानला जात आहे.