टोकियो : जपानच्या सत्ताधारी पक्षाने माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा यांची नेता म्हणून निवड केली आहे. पुढील आठवड्यात ते जपानचे पंतप्रधान होतील. या महिन्याच्या अखेरीस विद्यमान पंतप्रधान फुमिओ किशिदा हे पंतप्रधानपदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन पंतप्रधान निवडीची प्रक्रिया गेल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आली होती. यानुसार सत्तारुढ लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीतील इच्छुक नेत्यांमध्ये मतदानाद्वारे नवीन नेत्याची निवड करण्यात आली. शुक्रवारी शिगेरू इशिबा यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत शिंझो ऍबे यांचे टीकाकार असलेल्या इशिबा यांना जनतेमध्ये लोप्रियता असली तरी पक्षात त्यांना मोठे स्थान आतापर्यंत मिळू शकले नव्हते. अधिक उदारमतवादी प्रमुख विरोधी पक्षाने सरकारपुढे उभ्या केलेल्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मध्यममार्गी इशिबा यांची निवड करण्यात आली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. माजी बँक व्यवसायिक असलेल्या इशिबा हे पाचव्यांदा पक्षनेतृत्वाच्या शर्यतीत उतरले होते आणि ही त्यांची अंतिम लढत असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते पहिल्यांदा 1986 साली लोकप्रतिनिधी म्हणून निवडले गेले होते. त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि इतर महत्त्वाच्या कॅबिनेट पदांवर काम केले आहे.