वेल्हे -वीर बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांमध्ये सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. वीर बाजी पासलकर हे हिंदवी स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे वीर सेनानी असून न्यायदानाची ज्योत म्हणजे वीर सेनानी बाजी पासलकर होय, असे प्रतिपादन कात्रज पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान (बाप्पू) पासलकर यांनी केले. पानशेत (ता. वेल्हे) येथील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांची तिथीनुसार 371व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 19) आयोजित केलेल्या कार्यक्रमात पासलकर बोलत होते. पानशेत व वरसगाव धरण प्रकल्पाच्या मध्यभागी असलेल्या वीर बाजी पासलकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला त्यांचे वंशज बाळासाहेब पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भगवान पासलकर म्हणाले, वीर बाजी पासलकर हे बारा मावळांपैकी एक असलेल्या मोसे खोऱ्यातील 84 खेड्यांचे राजे होते. पासलकर ह्यांनी शिवरायांच्या सैन्यात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. मावळ खोऱ्यातील त्यांचे योगदान पाहून वरसगाव धरणातील जलाशयाला वीर बाजी पासलकर जलाशय असे नाव देण्यात आले आहे. वीर बाजी पासलकरांची समाधी सासवड येथे आहे. याप्रसंगी उद्योजक बाळासाहेब पासलकर, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचे दत्ताभाऊ पासलकर, उद्योजक विष्णूपंत पासलकर, विजय पासलकर, ज्येष्ठ पत्रकार शांताराम ठाकर, मोहन वायकर, सरपंच बापू पासलकर, कृष्णा पिसाळ, माऊली कांबळे, बापू कडू व 84 मोसे खोऱ्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग पाळत अत्यंत साध्या पद्धतीने वीर बाजी पासलकर यांच्या “आम्ही आमच्या मुलखाचे धनी’ ब्रीदवाक्याचा जयघोष करीत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.