शिरूर – करोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात “लॉकडाऊन’ आहे. तर या परिस्थितीत जीवनावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्यातही सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहे.
मात्र, शिरूर शहरात “सोशल डिस्टन्सिंग’चा “फज्जा’ उडाला आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना ग्राहक आणि विक्रेत्यांकडून या नियमला हरताळ फासल्याने “करोना’चा धोका वाढला आहे, तर याबाबत पोलीस, महसूल, नगरपरिषद प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत; परंतु या तक्रारीचे कुठेच निवारण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे, यामुळे भविष्यात त्याची मोठी किंमत शिरूर शहराला भोगावी लागणार आहे, हे मात्र निश्चित!
शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात सकाळी बाजार समिती आवारासमोर शहरांतर्गत रस्त्यावर बाजार भरवण्यात आला होता. नगर परिषदेच्या वतीने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भाजी, फळ बाजार रयत शिक्षण शाळेच्या मैदानावर भरवण्याचे ठरले असताना नगर परिषदेच्या प्रशासनाने मात्र पुन्हा एकदा यात बदल करून शहरातील अनेक ठिकाणातसुद्धा बाजार भरवला आहे, त्यामुळे भाजी घेणारे ग्राहक संपूर्ण शहरातील भाजी दुकानांवर फिरून पुन्हा शाळेच्या मैदानावर जात आहेत.
या अगोदर रोज सकाळी 11 ते 2 हा तीन तास भाजीबाजार भरवण्यात येत होता; परंतु नगरपालिका प्रशासनाने हा भाजी बाजार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करून काय साध्य केले, हेच कळत नाही. त्यात शहरातील अनेक ठिकाणी बाजार भरून ठेवला असल्यामुळे शिरूर शहरातील महिला, पुरुष, वृद्ध नागरिक, तरुण मोठ्या प्रमाणात बाजार, किराणा माल, औषधोपचाराच्या नावाखाली, दवाखान्याच्या नावाखाली घराबाहेर पडत असून सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, येथील आपत्कालीन व्यवस्थापन ग्रुप यांच्या वतीने आज शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये 73 जणांनी रक्तदान केले. आपत्कालीन ग्रुपचे तुकाराम खोले, संतोष शितोळे, सागर पांढरकामे यांनी आयोजन केले होते.
नागरिकांकडून बेशिस्तीचे दर्शन
लॉकडाऊन असले तरी मोठ्या प्रमाणात नागरिक भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली फिरताना दिसत होते, जनता कर्फ्यूवेळी शहरांनी शिस्त पाळली, पण सध्या मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून बेशिस्तीचे दर्शन घडत आहे. शहरातील अनेक नागरिक मॉर्निंग वॉक व सकाळी फिरण्याच्या नावाखाली गावांमध्ये उपनगरात फिरत असल्याचे दिसत आहे. याच सकाळच्या वेळी वृद्धांची संख्या जास्त असून वृद्धांनी या आजाराबाबत जागृत होणे गरजेचे आहे.
शिरूर शाळा मैदान येथे सुरू असलेल्या बाजारात करोना व्हायरस संदर्भात दिलेल्या सूचना दिल्या आहेत. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न राखणे यासंदर्भात या बाजारातील अनेक विक्रेत्यांना नोटीसा काढल्या असून, दोन विक्रेत्यांचे कायमस्वरूपी विक्री न करण्याची कारवाई केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर याहीपेक्षा कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– महेश रोकडे,
मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद