वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या न्याय विभागाने शुक्रवारी लैंगिक गन्ह्यातील कुख्यात दलाल जेफ्री एपस्टीनशी संबंधित हजारो फायली शुक्रवारी प्रसिद्ध केल्या. मात्र तपासाविना अर्धवट राहिलेल्या या फायलींमध्ये कोणत्याही महत्वाच्या व्यक्तीचे एपस्टीनशी निकटचे संबंध असल्याचे निष्पन्न झाले नाही. ट्रम्प आणि एपस्टीन यांचे काही फोटो प्रसिद्ध झाल्याने गदारोळ उडाला होता. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या फायलींमधून एपस्टीनचे प्रभावशाली व्यक्तींशी जवळचे संबंध असल्याचे कोणतेही तथ्य उजेडात येऊ शकले नाही. उघड झालेल्या फायलींमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे कधी न बघितले गेलेले काही फोटो मात्र पुढे आले. अनेक दशकांपुर्वी क्लिंटन यांनी एपस्टीनबरोबर केलेल्या प्रवासादरम्यानचे हे फोटो होते. उघड झालेल्या फायलींमध्ये ठोस निष्कर्ष काढता न आल्याने डेमोक्रॅटिक पक्षाबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनीही न्याय विभागावर कडवट टीका केली आहे. या फायली निश्चित कालमर्यादेत प्रसिद्ध न केल्याचा आरोप न्याय विभागावर केला जाऊ लागला आहे. तर या फायली प्रसिद्ध करताना पारदर्शकता जपल्याचे सांगून ट्रम्प प्रशासनाने न्याय विभागावर टोमणाच मारला आहे. न्याय विभाग कोणत्याही फायली प्रसिद्ध करणार नाही, असे प्रशासनाने काही महिन्यांपुर्वीच म्हटले होते. त्याकडे मात्र ट्रम्प प्रशासनाने दुर्लक्ष केले. या फायलींमधून ठोस काहीतरी हाती लागेल, असा अंदाज फोल ठरल्याने न्याय विभागाला आता सावरासावर करावी लागते आहे. एपस्टीनच्या लैंगिक गुन्ह्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या व्यक्तींची नावे, उघड होतील, असा अंदाज असल्याने या फायली उघड व्हाव्यात असा जोरदार आग्रह विरोधकांकडून केला जात होता. काही प्रकरणे २००८ पासून प्रलंबित होती. या प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून थांबवला गेला होता. त्यामागील कारणेही पुढे येतील, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. या फायलींची तपासणी केली जात असून हे वर्ष संपण्यापुर्वी आणखी काही फायली उघड केल्या जाण्याची शक्यता असल्याचे ऍटर्नी जनरल टॉड ब्लांच यांनी म्हटले आहे. काही कागदपत्रांची छाननी केली जात असून यातील पीडीत महिलांची नावे संपादित केली जात असल्याचे न्याय विभागाने म्हटले आहे. एपस्टीनशी संबंधित कागदपत्रे उघड करावीत, यासाठी मोठा दबाव आल्याने ट्रम्प यांनी १९ नोव्हेंबर रोजी या फायली उघड करण्यास मंजूरी दिली. एपस्टीनने तुरुंगात केलेल्या आत्महत्येशी संबंधित तपासाची कागदपत्रेही उघड करण्यास त्यांनी मंजूरी दिली होती. ट्रम्प यांच्याबद्दल फारच त्रोटक उल्लेख… उघड केलेल्या फायलींमध्ये ट्रम्प यांचा फारच त्रोटक उल्लेख आहे. यात ट्रम्प यांचे काहीदशकांपुर्वीचे फोटो आहेत. फेब्रुवारी २००० सालच्या या फोटोंमध्ये ट्रम्प आणि एपस्टीन हे विद्यमान फर्स्ट लेडी मेलानिया यांच्याबरोबर दिसत आहेत. ट्रम्प यांच्याच मार-ए-लागो या पाम बीच क्लबवरील एका कार्यक्रमातील हा फोटो आहे. मात्र त्यानंतर ट्रम्प आणि एपस्टीन यांच्यात दुरावा आला होता. ट्रम्प किंवा क्लिंटन दोघांनी एपस्टीन यांच्याबरोबरच्या मैत्रीचा गैरफायदा करून घेतल्याचा आरोप नाही. त्यामुळे या फायलींमध्ये त्यांच्या नावांचा केवळ उल्लेख आढळण्याने काहीही निष्पन्न होत नाही.