Vadh 2 movie : काही चित्रपट हे बिग बजेट नसले तरी त्या चित्रपटांचे विषय विचार करायला भाग पाडतात. तसेच बॅाक्स अॅाफिसवरही चांगली कमाई करतात. असाच एक चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव वध असून, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खेळवून ठेवले होते. आता वध चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा अनोखा लूक दिसत आहे. संजय मिश्रा पोलिसांच्या गणवेशात दिसत आहेत. तर नीना गुप्ता पांढऱ्या रंगाची साडीमध्ये दिसत आहे. हे पोस्टर्स शेअर करताना संजय मिश्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कधीकधी तुम्हाला जे दिसते ते संपूर्ण सत्य नसते.” यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची उलटी गिनती सुरू झाली आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे. लव रंजन यांच्या प्रोडक्शन हाऊस लव फिल्म्स निर्मित ‘वध २‘ चे लेखन आणि दिग्दर्शन जसपाल सिंग संधू यांनी केले आहे. वध २ मध्ये नवीन कथा असेल की ‘वध’ मध्ये दाखवलेली कथा पुढे नेली जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच चित्रपटातील इतर कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वधमध्ये दाखविण्यात आलेल्या क्राइम थ्रिलरला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांना दिला होता. या चित्रपटाची कथा एका सत्य घटननेवर आधारित होती. त्यामुळे ‘वध २’ मध्ये निर्माते कोणती कथा घेऊन येतात याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. हेही वाचा : मोठी बातमी ! आईच्या जातीवरून मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र ; न्यायालयाचा महत्वाचा निर्णय