National Onion Bhavan| शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कांदा शेती शाश्वत नफ्याची आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या देणगीतून जायगाव (ता.सिन्नर) येथे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारत हा जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश असतानाही कांदा आयात–निर्यात, निर्यातबंदी, नाफेड व एनसीसीएफचा बफर स्टॉक व दर नियंत्रणाचे निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जात होते. राष्ट्रीय कांदा भवन उभारल्यानंतर हे सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले जाणार असल्याचे दिघोळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील व देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीचे व्यवहार हे पूर्णपणे पारदर्शक, कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक, पिळवणूक किंवा लूट होणार नाही. निर्णय प्रक्रियेत शेतकरी सर्वोच्च स्थानी असणार आहे. या तत्त्वांवर राबवण्यासाठी राष्ट्रीय कांदा भवन येथून नियंत्रण ठेवले जाणार आहे. राष्ट्रीय कांदा भवन कुठे उभारले जाणार? राष्ट्रीय कांदा भवन हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे सुरुवातीला दोन एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून, भविष्यात गरजेनुसार अधिक क्षेत्रात त्याचा विस्तार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या देणगीतून उभारली जाणार आहे. तसेच हे जगातील पहिले आणि सर्वांत मोठे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ असणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेली लांब व दलालयुक्त साखळी कमी करून शेतकरी, राष्ट्रीय कांदा भवनमी देशी व परदेशी ग्राहक अशी थेट कांदा विक्री व्यवस्था उभारण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत नफा, तर ग्राहकांना माफक व स्थिर दरात कांदा मिळणार आहे. हेही वाचा: PMC Election: महाविकास आघाडीचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपला रोखण्यासाठी आता थेट ‘लेखी करार’