बहुचर्चित ‘बाबो’चा फर्स्ट लुक प्रदर्शित

यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित ‘बाबो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना इथं फुल वाव’ असं मजेशीर वर्णन या चित्रपटाचे करता येईल. महाराष्ट्रातील अनेक हास्यवीर ‘बाबो’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बाबो’ या चित्रपटाची निर्मिती सचिन बाबुराव पवार आणि तृप्ती सचिन पवार यांनी केली असून रमेश साहेबराव चौधरी हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांची आहे. या चित्रपटात आजवर अनेक मनोरंजक भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची मांदियाळी बघायला मिळेल, या नमुनेदार गावातील नमुन्यांची ओळख नुकतीच सोशल मिडीयावर करून देण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी, अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, प्रतिक्षा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे, अमोल कागणे, मंजिरी यशवंत, स्मिता डोंगरे, प्रिया उबाळे, अरुण शिंदे, पुष्पा चौधरी, प्रकाश भागवत, वैशाली दाभाडे, आकाश घरत आदी कलाकार या चित्रपटात आहेत. ‘बाबो’च्या लक्षवेधी फर्स्ट लुकची जोरदार चर्चा असून कलाकारांच्या मांदियाळीने नेमकी काय धमालमस्ती केली आहे? हे येत्या ३१ मे २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला समजणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.