Ginny Wedss Sunny 2 First Look : १२ वी फेल या चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मेधा शंकर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यास सज्ज आहे. “गिनी वेड्स सनी २” या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार असून, या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबत प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर “गिनी वेड्स सनी २” चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अविनाश तिवारी एका कुस्तीगीराची भूमिका साकारताना दिसत आहे. तो व्यायाम करताना पुश-अप करत आहे, तर मेधा शंकर त्याच्यावर ध्यानस्थ अवस्थेत बसलेली दिसत आहे. मेधा शंकर लाल साडीत खूप सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे, तर अविनाश तिवारी कुस्तीच्या कपड्यात शर्टलेस दिसत आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गिनी आणि सनी परत आले आहेत. नाते निश्चित झाले आहे, फक्त यावेळी थोडा ट्विस्ट आहे.” यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. हा चित्रपट २४ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विनोद बच्चन आणि उमेश कुमार बन्सल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत झा यांनी केले आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल आणि कथेबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट विक्रांत मेस्सी आणि यामी गौतम यांच्या २०२० मध्ये आलेल्या “गिनी वेड्स सनी” या चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. मात्र, यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार बदलले आहेत. चित्रपटाची कथा देखील पूर्णपणे वेगळी असणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. हेही वाचा :Nagar Parishad Fund : प्रत्येक प्रभागासाठी एक कोटींचा विकास निधी; आमदार शेळके यांची मोठी घोषणा