काटेवाडीमध्ये पार पडले श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण

काटेवाडी : काटेवाडी येथे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे पहिले असे भव्य रिंगण घालण्यात आले. वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू असल्याने सध्याच्या काळातील माणसांनी देखील ही परंपरा जपली असून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण घालण्यात आले. हजारो नागरिकांनी हा सोहळा डोळे भरून पाहिला.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे काटेवाडी येथे दुपारी बारा वाजता आगमन झाले. यावेळी खासदार सौ.सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार योगेंद्र पवार यांनी पालखीचे स्वागत केले. यानंतर ही पालखी काटेवाडी येथे दुपारी दोन तास विसावा घेऊन पुन्हा इंदापूर तालुक्याकडे मार्गस्थ झाली असता काटेवाडी येथील बस स्थानका जवळील चौकामध्ये परंपरागत चालत आलेल्या रिती रिवाजाप्रमाणे काटेवाडी येथील शेतकरी सोमनाथ माने, विकास केसकर, गुलाबराव महानवर, संभाजी काळे, राजेंद्र मासाळ, राहुल काळे या शेतकऱ्यांच्या मेंढ्यांनी रिंगण पार पाडले हा सोहळा पाण्यासाठी सर्व परिसरातून पुरुष, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अनेकांनी हा सोहळा डोळे भरून पाहिला.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बाजूने मेंढ्यांचे रिंगण झाले असता या पालखीने इंदापूर तालुक्याकडे प्रस्थान केले यावेळी गावातील अनेक नागरिक महिला पालखीबरोबर जाऊन इंदापूर तालुक्यातील भवानीनगर या ठिकाणी पालखी पोहोच झाले असता पुन्हा परतीचा मार्ग धरतात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर जाण्याचा आनंद नागरिकांना काही वेगळाच आनंद देऊन जातो म्हणून दरवर्षी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये भजनाच्या गजरामध्ये अनेक नागरिक महिला तरुण वर्ग या पालखीमध्ये सहभागी होऊन भवानीनगर पर्यंत जाण्याचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने पालखी येणार असल्यामुळे सकाळपासूनच परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याने या भक्तीरसामध्येच नागरिक महिला व तरुण वर्ग देखील सामावून जाऊन भक्ती रूपाचा आनंद घेतला.





