शिर्डी : पंढरपूरच्या धर्तीवर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात दर्शन रांगेतील पहिल्या दोन भाविकांना आरतीच्या वेळी साई समाधीच्याजवळ उभे राहण्याचा बहुमान मिळणार असून, त्याची सुरुवात १ जानेवारी या नवीन वर्षात होऊन उत्तरप्रदेशातील झाशी येथील दामप्त्याला हा मान प्राप्त झाला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबांच्या दैनंदिन होणाऱ्या मध्याह्न, धूप व शेजारतीसाठी सामान्य रांगेतील दोन साईभक्तांना पुढे उभे करण्याच्या कार्यपद्धतीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मध्याह्न आरतीवेळी करण्यात आला. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील झाशी येथील मनीष रजक आणि पूजा रजक या साईभक्त दांपत्याला हा मान मिळाला. या साईभक्तांचा सन्मान श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याहस्ते देणगीदार भक्तांच्या समवेत करण्यात आला. ही नवीन कार्यपद्धती सामान्य भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.ज्यामुळे त्यांना साईबाबांच्या आरतीसमयी अधिक जवळून सहभागी होण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हा उपक्रम भक्तांच्या भावनांचा आदर राखत साईबाबांच्या चरणी त्यांची सेवा व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. साईबाबा संस्थानच्या या महत्वकांशी निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी झाशी येथील बहुमान मिळालेले साईभक्त मनीष रजक यांनी सांगितले की,आम्ही दर्शनरांगेत उभे असताना दुपारच्या माध्यान्ह आरतीला आम्ही मंदिरात सर्वात पुढे होतो. तेव्हा अचानक आम्हाला साई समाधीजवळ आरतीसाठी उभे केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयुष्यात प्रथमच आरतीला एवढ्या जवळून बाबांना बघण्याचा भाग्य लाभले, याचा आनंद शब्दात सांगता येणार नसल्याचे सांगून त्यांनी साईसंस्थान प्रशासनाच्या या नाविन्यपूर्व उपक्रमाचे स्वागत केले.