गणरायाला निरोप देण्यासाठी अग्निशमन विभाग सज्ज

पिंपरी – गणेश विसर्जनासाठी यंदा 26 घाटांवर चोवीस तास दीडशे जवान तैनात करण्यात आले आहेत. सहा ते सात घाट मिळून एक उप अग्निशमन अधिकारी नेमण्यात आले आहेत. तर, विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अग्निशमन विभाग तत्पर राहणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेची क्रीडा विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यासाठी मदत करणार आहेत.

शहरातील चिंचवड, पिंपरी, रावेत, थेरगाव, काळेवाडी या परिसरातील घाटांवर प्रामुख्याने विसर्जन केले जाते. पाण्याचा विसर्ग केल्याने पवना नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अग्निशामक विभागाला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक घाटावर लाईफ रिंग, गळ, दोर देण्यात आले आहेत. सहा ते सात घाट मिळून एका उप अग्निशमन अधिकारी नेमण्यात आला आहे. तर, गर्दी होत असलेल्या घाटांवर बोट ठेवण्यात आली आहे. पिंपरी आणि चिंचवड या ठिकाणी अग्निशमनच आणि आपत्ती विभागाचे कर्मचारी तैनात आहे. तेथे प्रत्येकी एक रेस्क्‍यू वाहन देण्यात आले आहे. तर, इतर वाहने आवश्‍यक घाटांवर गस्त घालणार आहेत. अग्निशन दलाचे 135 कर्मचारी तैनात असणार आहेत. तर, इतर खासगी रक्षकही सोबत असणार आहेत.

शहरातील नदीघाटावर गणेशभक्‍तांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी घाटावर जीवरक्षक तसेच बोट उपलब्ध असेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने नदी घाटावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. अग्निशामक विभागाकडून महापालिलेकडे 25 जीवरक्षकांची मागणी करण्यात आली होती, परंतु पालिकेने केवळ दहा जीवरक्षक दिले आहेत.

शहरातील जवळपास सर्वच विसर्जन घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी बोटी ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे व सुरक्षित रित्या गणपती विसर्जन करावे.

– किरण गावडे, मुख्य अग्निशमक अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.