अर्थ-बांधकाम समितीचा पेच पंधरा दिवसांनी सुटणार

नगर – जिल्हा परिषदेत ज्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद मिळविण्यावरून महाविकास आघाडीतील चारही पक्षात तिढा निर्माण झाला होता तो पेच आता पंधरा दिवसांनी म्हणजेच दि.27 किंवा 28 जानेवारीला सुटणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होऊन ते अर्थ-बांधकाम व कृषी-पशुसंवर्धन समिती सभापती पदांचे वाटप करतील.यावेळी समितीतील सदस्यांची रिक्त पदेही भरली जातील.
जिल्हा परिषदेत सत्ताधारी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना व क्रांतीकारी शेतकरी पक्ष या चारही पक्षांना महत्वाची मानली जाणारी अर्थ-बांधकाम समिती हवी होती. मात्र चार पक्षांना चार समित्या देताना राष्ट्रवादीला समाजकल्याण,कॉंग्रेसला महिला बालकल्याण,शिवसेनेला अर्थ व बांधकाम तर क्रांतीकारी पक्षाला कृषी व पशुसंवर्धन समिती देण्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष निवडीच्या वेळी यावरून चांगलेच रणकंदन झाले.
चारही पक्ष या समितीसाठी हटून बसले होते. त्यात तडजोड होऊन पूर्वी चर्चा झाल्याप्रमाणे समाजकल्याण राष्ट्रवादीचे उमेश परहर यांना,तर महिला बालकल्याण समिती कॉंग्रेसच्या मीराताई शेटे यांना देण्यात आली. उर्वरीत दोन विषय समित्यांपैकी एकावर शिवसेनेचे काशिनाथ दाते यांची,तर एकावर क्रांतीकारी पक्षाचे सुनील गडाख यांची वर्णी लागली आहे. अजूनही यातील अर्थ-बांधकाम कुणाला व कृषी-पशुसंवर्धन कुणाला हे नक्की नाही.
अध्यक्षांनी बोलविलेल्या विशेष सभेत हा निर्णय अध्यक्षांचा असेल.अध्यक्ष घुले ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या असून राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष अर्थ-बांधकाम समिती शिवसेनेला देण्याच्या मनस्थितीत नाही. त्याऐवजी ती क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख यांना देण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे अध्यक्ष आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात हे बघणे महत्वाचे आहे. दाते व गडाख यांच्या समर्थकांनी ही समिती आपल्यालाच मिळाली असल्याच्या दावा केला आहे.





