पिंपरी | झेंडूच्या फुलांनी बहरली शेती

नाणे मावळ (वार्ताहर) – गुढीपाडवा सण अवघ्या सात दिवसावर आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झेंडूची मशागत सुरू केली आहे. गुढीपाडवा सणाच्या अगोदर शेतकरी दोन दिवस फुले तोडण्याची कामे सुरु करणार आहेत.
हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. महत्वाचा मुहूर्त आणि हिंदू नववर्षदिन यामुळे गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरातील देव-देवतांबरोबर, आपापल्या व्यवसायातील गाडी व महत्वाच्या साहित्यांची पूजा केली जाते. तर दुकानाच्या व घराच्या दारांवर पाना-फुलांची तोरणे बांधली जातात.
गुढीपाडव्याच्या या संपूर्ण पूजेमध्ये झेंडूच्या फुलाला मोठे महत्व असते. त्यामुळे दरवर्षी गुढीपाडवा सणाच्या दिवशी झेंडूच्या फुलांची शहरात मोठ्या प्रमाणात आणि चढ्या बाजारभावात विक्री होते. या गोष्टींचा फायदा घेण्यासाठी अनेक शेतकरी या काळात आपल्या शेतात झेंडूच्या पिकाची लागवड करतात.
दरवर्षी गुढीपाडवा आणि लग्नाच्या हंगामामध्ये हमखास पैसे मिळवून देणारे हक्काचे पीक म्हणून शेतकरी झेंडूचे पीक घेतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दर वर्षी सुमारे १०० ते १५० रुपये प्रतिकोलो पर्यंत भाव मिळत आहे.





