बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले आहे. बालेकिल्ल्यात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रचाराची आघाडी घेतली आहे. अजित पवार यांच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी बारामतीची राष्ट्रवादी कामाला लागले असून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार पत्नी सुनेत्रा पवार तसेच बहीण विजया पाटील प्रचारात उतरले आहेत.
विकासाच्या जोरावर बारामतीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा निर्विवादपणे फडकत आहे. त्याला बळकटी देण्याचे काम सध्या बारामती मतदारसंघात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या माताधिक्यापेक्षा जास्त मतदान अजित पवार यांना पडावे यादृष्टीने हालचाली सुरू आहे.
पाठीमागील विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना जवळपास 68 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवण्याकडे कल आहे किमान 80 टक्के मतदान मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. त्यासाठी प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे. घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. बारामती शहराची धुरा स्थानिक नेत्यांच्या मदतीने अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार संभाळत आहेत.
बारामतीत झालेल्या विकासाच्या मुद्द्यांवर बारामतीची निवडणूक फिरत आहे. विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीची राज्याला व देशाला ओळख आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी देखील बारामतीच्या विकासाचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार अजित पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून विकास झाला आहे. बारामतीच्या परिपूर्ण विकासासाठी अजित पवार यांनाच साथ देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने केली जात आहे.
बारामती विधानसभेत अजित पवार यांना सर्वाधिक मताधिक्य मिळणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता झटत असून त्यांच्या प्रयत्नांना आलेले यश गुरुवारी (दि. 24) निवडणूक निकाल लागल्यावर सगळ्यांना समजणार असून राज्यात नंबर एकचे मताधिक्य अजित पवार यांना असणार आहे.- किरण गुजर, ज्येष्ठ नगरसेवक, बारामती