मुंबई – एकीकडे राष्ट्रीय उत्पन्न विक्रमी पातळीवर गेले असताना अर्थव्यवस्थेच्या इतर बाबींची नकारात्मक आकडेवारी बाहेर येत आहे. सोमवारी डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयाचे मूल्य एक वेळ 34 पैश्यांनी कोसळून 89.79 रुपये प्रति डॉलर या निचांकी पातळीवर गेले होते. व्याजदर कपातीची शक्यता मंदावल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढूनही शेअर बाजारात बरीच विक्री झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून व्यापार युद्ध आणि इतर कारणामुळे डॉलरमध्ये झालेली परदेशी गुंतवणूक काढून घेतली जात आहे. या सर्व बाबींचा रुपयावर नकारात्मक परिणाम होत आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,595 कोटी रुपये काढून घेतले. दरम्यानच्या काळात अमेरिकेतील डॉलर बळकट होत आहे. त्याचबरोबर खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत. भारताला डॉलरच्या माध्यमातून खनिज तेल खरेदी करावे लागते. त्यामुळे डॉलरची मागणी वाढत आहे. तर आयातदाराकडून डॉलरची मागणी वाढत असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावरील दबाव कमी होत नाही. दिवसा अखेर रुपयाच्या मूल्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आणि शुक्रवारच्या तुलनेत रुपयाचा भाव 8 पैशांनी घसरून 89 रुपये 53 पैसे प्रति डॉलर या पातळीवर होता. जोपर्यंत भारत – अमेरिका व्यापार करार होत नाही, तोपर्यंत व्यापारातील तूट कमी होण्याची शक्यता मंदावत आहे. अशा परिस्थितीत देशातील परदेशी गुंतवणूक परत जात असल्याचे विश्लेषकाने सांगितले. मात्र भारताकडे जवळजवळ 690 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे. त्यामुळे भारताला लघु ते मध्यम पल्ल्यात त्या आघाडीवर चिंता करण्याची गरज नसल्याचे मत गेले आठवड्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केले होते.