बाप्पांच्या आगमनाचा उत्साह

बाजारपेठा ओसंडून : उलाढालीस चालना
पुणे – लाडक्या गणपती बाप्पांची शनिवारी प्रतिष्ठापना होत आहे. या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पूजेचे साहित्य खरेदीसाठी भक्तांची गर्दी होत आहे. पूजेच्या साहित्याला प्रचंड मागणी असल्याने सर्व प्रकारच्या साहित्याचे भाव तेजीत आहेत.
केवडा, कमळ, धूप, अगरबत्ती, वाती, उद, आसन, खारीक, खोबरे, बदाम, हळदी कोंब, रांगोळी, अष्टगंध, नारळ, रूमाल, तुळशी, आंब्यांची पाने, दुर्वा, कापूर, पाच फळे, विड्याची पाने, हळदी, कुंकू, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा आदी साहित्य बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या पूजेला आवश्यक असते. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पूजेच्या साहित्याची मार्केटयार्डातील फूलबाजारात आवक झाल्याचे फूल विभागप्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले.
बाप्पांच्या प्रतिष्ठापनेवेळी गडबड नको म्हणून गणेशभक्तांनी शुक्रवारीच पूजेच्या साहित्याची खरेदी केली. त्यामुळेच सकाळपासूनच सर्वत्र उत्साह दिसून आला. केवडा आणि कमळाच्या फुलाच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 रुपयांनी, तर इतर साहित्यांत 2 ते 5 रुपयांनी वाढ झाली. झेंडू, शेवंती आणि गुलछडी फुलास चांगले भाव मिळाले. झेंडूस किलोस 100 ते 200 रुपये, शेवंतीस 200 रुपये किलो, गुलछडीस 300 ते 350 किलोस भाव घाऊक बाजारात मिळाला.




