आणखी पाच विषयांची परीक्षा पुढे ढकलली

अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेतील गोंधळ दुसऱ्या दिवशीही कायम
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेतील गोंधळ दुसऱ्या दिवशीही कायम आहे. तांत्रिक कारणाने विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने पाच विषयांची परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ मंगळवारीही विद्यापीठावर आली आहे.
विद्यापीठामार्फत मंगळवारी 138 विषयांची परीक्षा घेण्यात आली. 79 हजार 252 विद्यार्थी ऑनलाइन आणि 6 हजार 268 जण ऑफलाइन परीक्षेसाठी अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत 62 हजार 230 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रातील ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने या परीक्षा रात्रीपर्यंत सुरू होत्या.
तांत्रिक अडचणीमुळे पाच विषयांची परीक्षा पुढे ढकलली असून ती दि. 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
सकाळच्या सत्रात ऑनलाइन परीक्षा झाली. त्यात तांत्रिक अडचणी दिसून आल्या. अर्थशास्त्र विषयासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाची निवड केली होती. त्यांना मराठीतून प्रश्न विचारले गेले. ज्या विषयांची परीक्षा होती, त्याऐवजी दुसऱ्या विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना दिसत होता. काही विद्यार्थ्यांना मूळ प्रश्नपत्रिकाऐवजी सराव प्रश्नपत्रिका दिसत होती.
दुपारच्या सत्रातही विद्यार्थ्यांना स्पष्टपणे प्रश्नपत्रिका दिसत नव्हती. ऑनलाइन परीक्षा सुकर असली तरी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाइनच्या तुलनेत मंगळवारी ऑफलाइनच्या परीक्षा काही तांत्रिक कारण वगळता सुरळीतपणे पार पडल्या.
ऑफलाइन अथवा ऑनलाइन परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांक आणि हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
टोल फ्री क्रमांक : 8826587588
हेल्पलाइन क्रमांक : 9717796797
नियोजनाचा अभाव
“माझा आज अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. त्यासाठी इंग्रजी भाषा निवडली होती. परंतु परीक्षा देताना प्रश्नपत्रिका मराठीत आली. इंग्रजीमधून अभ्यास केल्याने मराठीतून परीक्षा देणे शक्यच झाले नाही. त्यातच परीक्षा संपण्यास शेवटचे काही मिनिट शिल्लक असतानादेखील विद्यापीठाच्या हेल्पलाइनशी संपर्क होऊ शकला नाही. अंतिम वर्षाची ही परीक्षा असताना काहीच नियोजन नसल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.
या विषयांची परीक्षा पुढे ढकलली
1. एमएसस्सी केमिस्ट्री- इनऑरगॅनिक रिऍक्शन मेकॅनिझम
2. टीवायबीएस्सी – रियल ऍनॅलिसिस पार्ट 1
3. एमएसस्सी मॅथ्स् – ऍडव्हान्स्ड कॅल्क्युलस
4. बीकॉम – बिझनेस मॅनेजमेंट (मराठी)
5. टीवायबीएसस्सी – सॉलिड स्टेट फिजिक्स्





