NEET Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शुभम खैरनार याच्या हातात परीक्षा होण्याच्या तब्बल आठवडाभर आधी, म्हणजेच २७ एप्रिललाच प्रश्नपत्रिका आल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली आहे. सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर शुभम खैरनारने सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील काहींशी संपर्क साधला. त्यानंतर हे रॅकेट हरियाणामार्गे राजस्थानातील सिक्करपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. सिक्करमधून प्रश्नपत्रिका देशातील विविध राज्यांमध्ये आणि परीक्षा केंद्रांवर पोहोचवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका हातात पडताच शुभम खैरनार अचानक नाशिकमधून गायब झाला होता. तो दोन दिवस शहराबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. या काळात लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेचा प्रवास नाशिक–अहिल्यानगर–पुणे असा झाल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. टेलिग्रामचा वापर (NEET Paper Leak Case) धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये या नेटवर्कची साखळी सक्रिय करण्यात आली होती. या संपूर्ण रॅकेटमध्ये संशयितांनी टेलिग्राम या मेसेजिंग ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी अत्यंत गुप्त पद्धतीने व्यवहार करण्यात आले. आणखी मोठी नाव समोर येण्याची शक्यता (NEET Paper Leak Case) २७ मे ते ३० मे दरम्यान एका प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल १५ ते २० लाख रुपये घेतले गेल्याचा संशय आहे. परीक्षा होण्यापूर्वीच, म्हणजे ३ मेपूर्वीच पेपरची विक्री सुरू झाली होती. देशभरात पसरलेल्या या रॅकेटमुळे आता CBIने तपासाची सूत्रे हाती घेतली असून, कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू करण्यात आला आहे. संशयितांच्या बँक खात्यांसह आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. NEET Paper Leak Case : परीक्षा आधीच सुरू झाली होती पेपरची विक्री! NEET पेपरफुटीप्रकरणी मोठी माहिती समोर दरम्यान, या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक विद्यार्थी संघटनांनी परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षाव्यवस्था यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : Sunil Tatkare : पार्थ पवारांनंतर तटकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय?