#COEPZEST’20: सीओईपीच्या ‘झेस्ट-२०’ क्रीडा महोत्सवाची सांगता

पुणे: रविवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘झेस्ट-२०’ क्रीडा महोत्सवाची सांगता झाली. २३ तारखेला सुरू झालेल्या ह्या चार दिवसीय सोहळ्याअंतर्गत अनेक क्रीडास्पर्धा आणि उपक्रम घेण्यात आले. ह्यात पुण्यातील ३ प्रमुख क्रीडांगणांवर २१ विविध खेळांच्या स्पर्धा ८१ क्रीडा प्रकारांमधून घेण्यात आल्या. ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून ७ हजारहुन अधिक स्पर्धकांनी उपस्थिती नोंदवली. तर ह्या उत्कंठावर्धक स्पर्धांचा थरार अनुभवण्यासाठी सुमारे १९ हजारहुन अधिक प्रेक्षकांनी सहभाग नोंदवला.

मागील १७ वर्षात केलेल्या दिमाखदार कामगिरीमुळे ‘झेस्ट’नी अल्पावधीतच भारतातील काही मानाच्या महाविद्यालयीन महोत्सवांच्या यादीत स्थान मिळवले आहे तसेच यंदाच्या १८व्या आवृत्तीतदेखील दर्जेदार कामगिरीमुळे हे स्थान अधिक प्रबळ होईल असा विश्वास आयोजकांना आहे.यंदा दरवर्षी होणाऱ्या उपक्रमांबरोबरच काही नवीन उपक्रमदेखील घेण्यात आले. ह्यामध्येप्रामुख्याने सायक्लोथॉनचा समावेश होतो. तसेच ‘अभेद्य- महिला स्वसंरक्षण कार्यशाळेची’ व्याप्ती वाढवून ती यंदा महाराष्ट्रातील ६ प्रमुख शहरांमध्ये घेण्यात आली. तसेच काही नवीन व नाविन्यपूर्ण क्रीडाप्रकारांची भर देखील स्पर्धांमध्ये घालण्यात आली.

‘झेस्ट-२०’ अंतर्गत घेण्यात उपक्रमांना नववर्षासोबत सुरुवात झाली. उपक्रमांची सुरुवात झाली ती ‘अभेद्य- महिला स्वसंरक्षण कार्यशाळेनी’. गतवर्षी मिळालेल्या पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद येथील प्रचंड प्रतिसदानंतर यंदा ‘महिला आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई’ ह्यांच्या सहयोगाने पुणे, मुंबई, औरंगाबाद ह्या तीन शहरांसोबतच अमरावती, सांगली व नाशिक येथेदेखील स्वसंरक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या.महिलांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारास प्रतिकार करण्यासाठी सक्षम बनवणे हा ह्या कार्यशाळांमागील मुख्य हेतू होता. झालेल्या कार्यशाळांमध्ये मिळालेला सहभाग अतुलनीय होता. ह्या सहभागामुळे येणाऱ्या आवृत्यांमध्ये ही व्याप्ती अधिक वाढवण्याचा आयोजकांचा आत्मविश्वास वाढला.

ह्या कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर १२ जानेवारीला झेस्ट तर्फे ‘सायक्लोथॉन’आयोजित करण्यात आली. हा उपक्रम ‘इंडो सायकलिस्ट क्लब’ ह्यांच्या सहयोगाने आणि ‘पुणे महानगर पालिका’, ‘स्वच्छ  सर्वेक्षण’, व ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. ह्या उपक्रमात अगदी १० वर्षांच्या चिमुरड्यांपासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचा सहभाग दिसून आला. सकाळी ६ वाजता  अत्यंत उत्साहाच्या वातावरणात सहभागी स्पर्धकांनी सायकलिंगला सुरुवात करत सीओएपी मैदान, शिवाजीनगर पासून पाषाण व तिथून परत शिवाजीनगर अश्या पद्धतीने १५ किलोमीटर लांबीचा पल्ला पार केला. आयोजकांशी संवाद साधला असता ह्या सायक्लोथॉनचा उद्देश “समाजामध्ये सायकलस्वारांच्या सुरक्षिततेबद्दल जागृती निर्माण करणे व सक्षम, निरोगी आणि प्रदूषणविरहित पर्यावरणासाठी वाहतूकीचे मुख्य साधन म्हणून सायकल वापरण्याचा पायंडा पाडणे” असा आहे हे समजले.ह्यामध्ये पुण्यातील सुमारे ३४६ सायकलस्वारांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पुढील वर्षी होणाऱ्या तिसर्‍या आवृत्तीत हा आकडा आणखी वाढेल असा विश्वास आयोजकांनी दर्शवला.

‘सायक्लोथॉन’ नंतर १९ जानेवारीला ‘मॅरेथॉन’ स्पर्धेचेआयोजन करण्यात आले होते. ही मॅरेथॉन स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. ‘मॅरेथॉन’ स्पर्धा ‘ झोनल ट्रान्सप्लान्ट काँरडिनेशन सेंटर ‘ ह्यांच्या सहयोगाने व ‘पुणे महानगरपालिका’, ‘ स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे’ ह्यांच्या अधिपत्त्याखाली घेण्यात आली. स्पर्धा ३ किमी, ५ किमी,१० किमी व २१ किमी अश्या ४ प्रकारांमध्ये घेण्यात आली. ही मॅरेथॉन स्पर्धा खुली स्पर्धा असल्या कारणाने दिव्यांगांना व अंधांनादेखील ह्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.  ह्या स्पर्धेसाठी वयाचं कोणतही बंधन नसल्याने अबालवृद्धांचा अगदी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.  १९ तारखेला सकाळी ५ वाजता  अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला सुरुवात झाली. सहभागी स्पर्धकांनी सीओएपी मैदान, सेंट्रल माल, अखिल हाऊस, एनसीएल गेट, एचपी शिंदे पेट्रोलपंप व तिथून परत सीओईपी मैदान ह्या विहीत मार्गावर अनुक्रमे ३, ५, १०, २१ किमींचा पल्ला  पार केला. ह्या मॅरेथॉन मध्ये  सेवानिवृत्त झालेल्या अनेक दिव्यांग जवानांनी सहभाग घेतला. तसेच अंध स्पर्धकांचा देखील ह्या स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग होता. ह्या मॅरेथॉनचा उद्देश ” शारिरीक आणि मानसिक कल्याणासाठी समाजात एक निरोगी संस्कृती रुजविणे व अवयवदानाचा प्रसार करणे” असा होता. चारी प्रकारात मिळून एकूण १८०० स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला. गतवर्षी १५०० स्पर्धकानंतर यंदा १८००चा पल्ला गाठत ‘झेस्ट’ नी स्वतःसाठी नवीन मानदंड रचला.

मरेथॉनच्या यशानंतर २३ जानेवारीला गुरुवारी सायंकाळी ‘झेस्ट-२०’चा मुख्य उद्घाटन सोहळा मोठया जल्लोषात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कुस्तीपटू सौ. गीता फोगाट ह्यांनी हजेरी लावली. सोबतच अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्रभारी संचालक श्री जी. व्ही परिषवाड, सहयोगी विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता श्री धामणगावकर, जिमखान्याच्या उपाध्यक्षा एस. एस. भाविकट्टी, झेस्ट च्या प्राध्यापिका सल्लागार सौ. अहिल्या ढेरे व शारिरीक विकास विभागाच्या प्रमुख सौ. अमृता देशपांडे हे देखील मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी प्रमुख पाहुण्यांनी पत्रकार परिषदेद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व क्रीडा संघांच्या परेडनी झाली. ह्या नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  सोहळ्याचे उद्घाटन करत झेस्ट च्या यंदाच्या पर्वास सुरुवात झाली. उद्घाटनानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सौ. गीता फोगाट ह्यांनी अत्यंत सहज शब्दात पण प्रभावी पणे आपली कारकीर्द आणि त्यातील आत्मविश्वास व शिस्तीचे महत्व ह्याबद्दल प्रेक्षकांना संबोधित केले.

ह्यानंतर ‘ इडिफाय द कोअर ‘ ह्या यंदाच्या घोषवाक्यास साजेसा असणारा योगशालेच्या सदस्यांनी सादर केलेला खेळ प्रेक्षकांनी अनुभवला. अत्यंत अभूतपूर्व ठरलेल्या ह्या प्रयोगात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. ह्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानत सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.  ह्या सोहळ्याची सुरुवात दिमाखात झाली. प्रमुख पाहुण्यांनी आयोजकांचे कौतुक केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी दिवसभरातील दमवणाऱ्या सामन्यानंतर सर्व स्पर्धकांनी व प्रेक्षकांनी सायंकाळी सीओईपी विरुद्ध एम.आय.टी ह्या बास्केटबॉल सामन्याचा आनंद लुटला ‘झेस्ट-२०’च्या सांगतेच्या पूर्वसंध्येला शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  ह्या स्पर्धेत पुण्यातील अनेक व्यायाशाळांमधील स्पर्धकांनी हजेरी लावली. यंदाच्या पर्वात आयोजकांनी ‘रायफल शूटींग’ वा इनडोअर रोईंग ह्या दोन क्रीडाप्रकारांचा समावेश केला होता.

४ दिवस चाललेल्या ह्या सोहळ्याची सांगता रविवारी सायंकाळी बक्षीस वितरणाने झाली. बास्केटबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खोखो, बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल या खेलांमधील सर्व विजेत्या संघांना व स्पर्धकांना सन्मानचिन्हे, पदके व रोख रक्कम देण्यात आली. अश्या पद्धतीने झेस्टचे १८वे पर्व अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.ह्या पूर्ण उपक्रमात सीओएपीच्या ‘झेस्ट-२०’ अंतर्गत काम करणाऱ्या २००हून अधिक स्वयंसेवक, समन्वयक आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुखांचा अत्यंत उत्स्फूर्त आणि उत्साहपूर्ण सहभाग होता.

ReplyForward

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here