प्रभात वृत्तसेवा पिंपळे गुरव – “शाळा आहे, विद्यार्थी आहेत… पण मुख्याध्यापक नाहीत!” पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याच्या निषेधार्थ मनसेने अभिनव पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.शुक्रवारी (दि. १) सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेत मनसेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनात शहर उपाध्यक्ष राजू सावळे, उप विभाग अध्यक्ष अलेक्सझांडर आप्पा मोझेस, मंगेश भालेकर, आणि शाखाध्यक्ष विशाल पाटील सहभागी झाले होते. या वेळी मनसे शिष्टमंडळाने आयुक्त शेखरसिंह यांना निवेदन देत सात दिवसांत रिक्त पदांची भरती न झाल्यास आयुक्त दालनात मनसे स्टाईल’ आंदोलन करू, असा इशारा दिला. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, मुख्याध्यापक नसल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना निर्णयप्रक्रियेत अडथळे येत आहेत. यासोबतच अनेक शाळांमध्ये कला शिक्षकही नाहीत, हेही त्यांनी अधोरेखित केले. मनसेच्या म्हणण्यानुसार, नियमित वर्ग सुरू असूनही प्रशासनाने रिक्त पदांकडे दुर्लक्ष केले आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी तातडीने निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. मनसेच्या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडणार हे निश्चित मानले जात आहे. “५० नव्हे, केवळ ५–६ शाळांमध्येच मुख्याध्यापक नाहीत. काही ठिकाणी वरिष्ठ शिक्षकांना तात्पुरता चार्ज दिला आहे आणि भरती प्रक्रिया सुरू आहे.” – संगीता बांगर, मनपा शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी