O. P. Nayyar: स्वर-तालाचा बादशहा: ओ. पी. नय्यर!
O. P. Nayyar: ह्रिदम किंग या नावाने ओळखले जाणारे ओ. पी. यांचे हे जन्मशताब्दी वर्ष.

O. P. Nayyar: ओ. पी. नय्यर…..
ह्रिदम किंग या नावाने ओळखले जाणारे ओ. पी. यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. 16 जानेवारी 1926 रोजी लाहोर इथे जन्मलेले ओ. पी. कुठलेही संगीताचे अधिकृत शिक्षण त्यांनी घेतलं नसूनही अनेक अजरामर गाणी त्यांनी केली जी आजही आपल्या मनात कायमची कोरली गेली आहेत….
सुरवातीला त्यांनी कनीज या चित्रपटाला बॅकग्राऊंड संगीत दिले… पण त्यांनी स्वतंत्र पणे संगीत दिलेला पहिला चित्रपट म्हणजे 1952 साली आलेला दलसूख पंचोली यांचा आसमान… त्याची गाणी विशेष गाजली नाहीत… त्या नंतर आलेले छम छमा छम आणि गुरु दत्त चा बाज यातील गाण्यांची पण विशेष दखल घेतली गेली नाही….
ओ. पी मधला खरा संगीतकार बाहेर आणण्याचे काम केले गुरुदत्त ने… त्याने ओळीने तीन चित्रपट ओ. पी ना दिले.CID, आर पार आणि Mr. & Mrs. 55.तिन्ही चित्रपट तुफान गाजले आणि त्यातील गाणी पण तुफान गाजली. या चित्रपटांनी ओ. पी ला खरी ओळख दिली आणि तिथून पुढे ओ. पी ने मागे वळून बघितले नाही…
मूळचे पंजाबी असलेले ओ. पी त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये ढोलक वापरला जायचा आणि त्याच्या ठेक्या मुळे त्यांची गाणी आपोआप आपल्याला ठेका घ्यायला भाग पडायची.. आशा भोंसले, गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्या कडून एकाहून एक सुरेल गाणी गाऊन घेतली आणि ती लोकप्रिय पण झाली…
पण ते एकमेव असे संगीतकार आहेत ज्यांनी लता दीदी सोबत एकही गाणे केले नाही.. ते म्हणायचे कि माझ्या ठेक्या ला अनुसरून लता चा सुरेल आणि बारीक आवाज जमत नव्हता त्यामुळे त्यांनी सगळी गाणी जास्त करून आशा कडून व उर्वरित गाणी गीता व शमशाद कडून म्हणून घेतली.
त्यांचा आवडता गायक म्हणजे रफी… अनेक सुरेल आणि उत्तम गाणी रफी कडून म्हणून घेतली…रफी साहेबांनी जॉनी वॉकर चा हुबेहूब आवाज प्रथम CID मधील ये हैं बॉंबे मेरी जान या गाण्यात काढला आणि तो आवाज जॉनी वॉकर ची ओळख बनला.. त्यानंतर अनेक गाणी जॉनी वॉकर ची आर पार, छुमंतर, माई बाप,Mr. &Mrs. 55 इत्यादी खूप गाजली…

O. P. Nayyar
किशोर कुमार ने सुरवातीला ओ. पी सोबत काम केले आणि त्याची बाप रे बाप, रागिणी, भागम भाग यातील गाणी लोकप्रिय झाली…त्याचे पिया पिया पिया हे गाणे व त्यातील किशोर चे योडलिंग आजही ऐकावेसे वाटते… किशोर च्या रागिणी चित्रपटात मन मोरा बावरा हे शास्त्रीय संगीतावर आधारित एक सुरेल गाणे आहे.. ओ. पी ने किशोर ला सांगितले कि हे गाणे फक्त रफीच म्हणू शकतो आणि किशोर ने ते मान्य केले.
हे एकमेव गाणे आहे ज्यात किशोर सारख्या नामवंत गायकाला रफी साहेबांनी आवाज दिला आहे आणि हि किमया ओ. पी ने साध्य केली.
आशा भोसले यांना खरी ओळख मिळाली ती ओ. पी च्या गाण्यातूनच..कितीतरी हिट गाणी आशा ने गायली आहेत..
यही वोह जगह हैं, आँखो से जो उतरी हैं दिल में,ये हैं रेशमी, मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ, शमशाद सोबत कजरा मोहोब्बत वाला, अशी एकाहून एक दर्जेदार गाणी आशा ने गायली.. तिच्या चैन से हमको कभी या गाण्याला उत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेर पुरस्कार दिला गेला.. रफी आणि आशा यांची अनेक युगल गीते पण खूप गाजली आहेत जी आजही आपल्या मनावर अधिराज्य करीत आहेत..
ओ. पी साहेबांची राहण्याची एक विशिष्ट रुबाबदार शैली होती..ते नेहमीच पांढऱ्या शुभ्र शर्ट पॅन्ट मध्ये असायचे आणि डोक्यावर टोपी असे रुबाबदार व्यक्तिमत्व होते त्यांचे. तसेच प्रचंड शिस्तप्रिय.. त्यांना रेकॉर्डिंग ला सगळे वेळेवर हजर लागायचे..
मजरुह, कमर जलालाबादी, एस.एच.बिहारी, जान निसार अख्तर हे त्यांचे हुकमी गीतकार ज्यांनी आजवर अनेक अजरामर गाणी ओ. पी करता लिहिली.
घोड्याच्या टापांचा आवाज वापरावा तर ओ. पी नीच.. मांग के साथ तुम्हारा, बंदा परवर, पिया पिया पिया,सच कहता हूँ, ये क्या कर डाला तूने अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.
शम्मी कपूर सुरवातीच्या काळात एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत होता आणि ओ. पी नी तुमसा नहीं देखा या चित्रपटाला संगीत दिले आणि त्याची सगळी गाणी हिट झाली आणि शम्मी कपूर रातोरात स्टार झाला.विश्वजित, जॉय मुखर्जी यांना खरी ओळख केवळ ओ. पी च्या गाण्यानी दिली.
1950 ते 1970 या काळात ओ. पी नी अनेक हिट दिले. त्याकाळी अनेक दिग्गज संगीतकार असून सुद्धा ओ.पी नी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि सिनेमे चालले असो अथवा नसो पण गाणी मात्र प्रचंड गाजली आणि आजही आपल्या मनावर गारुड करत आहेत. ओ. पी ना त्यांच्या सांगितिक कारकिर्दीत फक्त एकच फिल्मफेर नया दौर करता मिळाले…
माझ्या मते हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे..कश्मिर कि कली, मेरे सनम, फिर वही दिल लाया हूँ,एक मुसाफिर एक हसीना असे अनेक चित्रपट आहेत ज्यांची गाणी तुफान गाजली पण फिल्मफेर ने त्याची दखल घेतली नाही.तसेही ओ. पी या सगळ्या गोष्टींच्या वर होते.. ते कायम स्वतः ला जसे पटेल तसे ऐटीत राहिले.त्यांच्या गाण्यांमध्ये पश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा उत्कृष्ट मिलाफ असायचा आणि अनेक श्रवणीय गाणी त्यांनी आपल्याला दिली.
मी खूप भाग्यवान आहे कि दोन वेळा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना चर्चगेट च्या घरी प्रत्यक्ष भेटलो…त्यांच्या रॉयल पियानो वर त्यांनी मिट्टी में सोना या सिनेमातील पूछो ना हमें हम उनके लिए हे गाणं वाजवलं आणि मी मंत्रमुग्ध झालो.. मन तृप्त झाले… आपल्या लाडक्या संगीतकाराला याची देही याची डोळा समोर प्रत्यक्ष त्यांचा पियानो ऐकला अजुन काय हवे ?
आज हा संगीताचा बादशहा आपल्यात नाही पण त्यांची अवीट सुमधुर गाणी वर्षानुवर्षे आपल्याला आनंद देतील..आणि कुठेतरी नय्यर साहेब पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये टोपी घालून रुबाबदारपणे आपल्यातच असल्याची जाणीव करून देतील..

