मंचर, – आंबेगाव विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा विजयी झाले असून निवडणूक प्रचार काळात त्यांनी पुन्हा निवडून आल्यानंतर आंबेगाव-शिरूर तालुक्यातील पाणी प्रश्नावर सातत्याने काम करणार असून हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मतदारांना दिली होती. त्यामुळे आता वळसे पाटील दिलेली आश्वासने कधी व कशी पूर्ण करतात. याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे. आमदार दिलीप वळसे पाटील गेली ३५ वर्ष आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या कार्यकाळात आंबेगाव तालुक्यासह शिरूर तालुक्यातील ४२ गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. विविध कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी वळसे पाटील यांनी आणला असून त्या माध्यमातून आंबेगाव तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र, आंबेगाव-शिरूर तालुक्यात मुख्यत्वे करून असलेल्या पाणी प्रश्नावर अद्याप तोडगा काढत न आल्याने यंदाची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरून चांगलीच गाजली. लोणी धामणी म्हाळसाकांत पाणी योजना, सातगाव पठार भागातील कलमोडी प्रकल्प, आदिवासी भागातील कळमजाई पाणी उपसा प्रकल्प, शिरूर तालुक्यातील केंदुर, पाबळ बारा गावासाठी पाणी योजना ही कामे मार्गी लावता न आल्याने मतदार संघात ऐन निवडणुकीत नाराजी व्यक्त होत होती. त्यांमुळे निवडणूक प्रचार कार्यकाळात वळसे पाटील यांनी तालुक्यात विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या पुढील काळातही विकास कामे होत राहतील. मात्र या पुढील काळात मुख्यत्वे करून पाण्याच्या प्रश्नांवर काम केले जाईल. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, पिण्यासाठी पाण्याच्या प्रश्न कायमचा सोडवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे आता वळसे पाटील हे लोणी धामणी सह ईतर गावातील गावांना महत्त्वाचा असणारा म्हाळसाकांत प्रकल्प सातगाव पठार भागातील कलमोडी प्रकल्प आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील कळमजाई पाणी उपसा प्रकल्प,शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ गावासह बारा गावांसाठी पाणी योजना या योजना कशा पद्धतीने मार्गी लावतात. आता प्रश्न सुटण्याची आशा याकडे आंबेगाव-शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष असणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. वळसे पाटील हे सरकारमध्ये सामील असल्याने त्यांना आता लवकरच राज्यात मंत्रिपद मिळून महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याचे चर्चा होत आहे. महायुतीचे सरकार असल्यामुळे वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील पाणी प्रश्न सह विविध प्रश्न लवकरच मार्गी लागतील अशी आशा मतदारांना आहे.