पौड : मुळशी तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज वितरण आणि स्वीकारण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी इच्छुकांनी पौड येथील सेनापती बापट सभागृहात अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी ५७ उमेदवारांनी तब्बल १४५ अर्ज नेले आहेत, मात्र अद्याप एकही अर्ज अधिकृतपणे दाखल झालेला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले आणि तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रशासकीय प्रक्रिया राबवली जात आहे. अनेक उमेदवारांनी तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त, म्हणजे प्रत्येकी दोन ते चार अर्ज घेतल्याने अर्जांचा आकडा विक्रमी ठरला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, कोणत्या गटातून कोण मैदानात उतरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेवटच्या दिवशी अर्जांची प्रत्यक्ष संख्या आणि रिंगणात असलेल्या उमेदवारांचे स्पष्ट चित्र समोर येईल. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल उदमले, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विजयकुमार चोबे , नायब तहसीलदार मदन जोगदंड, सहाय्यक महसूल अधिकारी बंडू कुबडे, सहाय्यक महसूल अधिकारी मंगेश शिंगटे व इतर महसूल अधिकारी, महसूल सेवक व पौड पोलिस स्टेशन चे पोलिस हवालदार चंद्रकांत सोनवणे, हवालदार राजकुमारी हरिश्चंद्रे उपस्थित होते. महत्वाच्या तारखा – अर्ज दाखल :- दि.१६ जानेवारी ते दि.२१ जानेवारी अर्ज छाननी :- दि.२२ जानेवारी अंतिम अर्ज माघारी :- दि.२७ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप :- दि.२७ जानेवारी दुपारी तीन नंतर मतदान :- ०५ फेब्रुवारी २०२६ मतमोजणी ,निकाल :- ०७ फेब्रुवारी २०२६