कोलकाता : प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) गुरुवारी कोलकाता आणि दिल्ली येथे निवडणूक व्यवस्थापन कंपनी ‘आय-पॅक’शी संबंधित दहा ठिकाणी छापे टाकले. ही कंपनी प्रशांत किशोर यांनी सुरू केली असून सध्या ती तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेचे व्यवस्थापन करत आहे. याच वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने या कारवाईवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. वृत्तांनुसार, कोलकात्यात सहा आणि दिल्लीत चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये आय-पॅकचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानाचाही समावेश होता. या कारवाईदरम्यान विरोधाचा सामना करावा लागल्याचा दावा ईडी अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, आय-पॅकने ईडीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून छाप्यांदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तसेच आय-पॅकने छापे थांबवावेत, यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ईडीने राजकीय सूडबुद्धीने छापे टाकल्याचा आरोप करत त्यांनी राज्यभर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “आमच्या आयटी विंगवर आणि त्याच्या प्रमुखांवर छापे टाकणे हे दुर्दैवी आहे,” असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र दावा केला की, छाप्यांच्या वेळी राज्य सरकारचा हस्तक्षेप झाला आणि तपासात अडथळे निर्माण झाले. या प्रकरणी ईडी उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. ईडी सूत्रांच्या मते, ही कारवाई कोळसा चोरी प्रकरणाशी संबंधित आहे. पश्चिम बंगालमधील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या लीज क्षेत्रातून झालेल्या कथित अवैध कोळसा उत्खनन आणि हवाला व्यवहाराच्या तपासातून काही नवीन पुरावे समोर आल्याने हे छापे टाकण्यात आले. या प्रकरणात यापूर्वी सीबीआय आणि ईडीने तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी केली आहे. तसेच काही आरोपींना अटक करण्यात आली असून काहीजण फरार असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.